Maharashtra Government : नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 02:24 PM2019-11-20T14:24:22+5:302019-11-20T14:25:29+5:30

Maharashtra News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Sharad Pawar Met Narendra Modi to discuss the issues of farmers in Maharashtra | Maharashtra Government : नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले....

Maharashtra Government : नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले....

Next

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यात सध्या असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. दरम्यान, या भेटीमध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न आपण पंतप्रधान मोदींकडे मांडला. तसेच या नुकसानीकडे मोदींचे लक्ष वेधल्याचे शरद पवार यांनी ट्विटरवरून सांगितले. मात्र या भेटीदरम्यान कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी ट्विटरवरून या भेटीसंदर्भातील सविस्तर माहिती दिली. त्यात शरद पवार म्हणतात की, ‘’आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांच्याशी महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत चर्चा केली. यंदा अतिवृष्टीमुळे राज्यात अकल्पनीय असे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा फटका ३२५ तालुक्यांना बसला आहे. अवकाळी पावसामुळे ५४.२२ लाख हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाले आहे. ही बाब मी मोदींच्या कानावर घातली आहे.’’

या महिन्याच्या सुरुवातीला मी नाशिक आणि विदर्भाच्या दौऱ्यावर जात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली होती. तेथील शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले होते. परतीच्या पावसामुळे राज्यातील बहुंतांश भागात सर्व प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले आहे, याकडे मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष वेधले, असे शरद पवार यांनी सांगितले.

 दरम्यान, शरद पवार यांनी ही भेट आटोपल्यानंतर या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले. मात्र शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यातील बैठक आटोपल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी तातडीने मोदींची भेट घेऊन चर्चा केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Web Title: Sharad Pawar Met Narendra Modi to discuss the issues of farmers in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.