शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नाहीत - राष्ट्रवादी
By admin | Published: April 18, 2017 11:02 PM2017-04-18T23:02:01+5:302017-04-18T23:02:01+5:30
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचं राष्ट्रवादीनेच स्पष्ट केलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचं राष्ट्रवादीनेच स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. शरद पवार हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील का, या प्रश्नावर पत्रकारांनी त्रिपाठींना छेडले असता, त्रिपाठींनी पवार स्पर्धेत नसल्याचं सांगितलं आहे.
ते म्हणाले, शरद पवार हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि नेते आहेत. त्यांनी या पदासाठी शर्यतीत राहण्याचा प्रश्नच नाही. काही इतर पक्षाचे नेते ही निवडणूक लढवणार आहेत. मात्र शरद पवार अजिबात नाही, असं उत्तर डी. पी. त्रिपाठी यांनी पत्रकारांना दिलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवारांना पद्मविभूषण या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्याच दरम्यान शरद पवारांचं नाव राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. या जुलैमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असून, भाजपाकडून लालकृष्ण आडवाणींच्या नावाची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेनं मात्र सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित करावं, अशी मागणी केली होती. त्यानंतर भागवतांनी स्वतः ही मागणी गांभीर्याने न घेण्याचं आवाहन करत फेटाळून लावली होती.
एनडीएच्या बैठकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी राष्ट्रपतीपदाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी लोकसभेतले 543 खासदार, राज्यसभेचे 233 खासदार मतदान करतात. असे एकूण मिळून 776 खासदारांची मते ग्राह्य धरली जातात. तर दुसरीकडे भारतातल्या राज्यांमधील विधानसभेचे आणि विधान परिषदेचे असे एकूण मिळून 4120 आमदारही मतदान करतात.