Sharad Pawar: 'मोदींना मी एकटाच भेटलो नाही', शरद पवारांनी थेट पत्रकार परिषद घेऊन सांगितलं भेटीचं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 04:45 PM2022-04-06T16:45:04+5:302022-04-06T16:47:11+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दिल्लीत झालेल्या बैठकीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.
नवी दिल्ली-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दिल्लीत झालेल्या बैठकीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. "पंतप्रधान मोदींना मी एकटा भेटलेलो नाही. आमचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पी.पी. देखील भेटीवेळी उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधानांसमोर लक्षद्वीपमध्ये नागरिकांचा प्रशासकाविरोधात सुरू असलेल्या रोषाची माहिती दिली. मी फक्त सोबत उपस्थित होतो. तसंच मीही दोन मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींचं लक्ष वेधलं", अशी माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
लक्षद्वीपमध्ये प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्याकडून लक्षद्वीपमध्ये केल्या जाणाऱ्या विकास कामांविरोधात स्थानिक नागरिकांचा रोष असून गेल्या १५ महिन्यांपासून याबाबत नागरिक निषेध व्यक्त करत आहेत. तसंच प्रशासक प्रफुल्ल पटेल यांना हटविण्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे लक्षद्वीपमधील खासदार मोहम्मद फैजल पी.पी यांनी पत्रकार परिषदेत दिली. "लक्षद्वीपमध्ये प्रशासक प्रफुल पटेल आल्यापासून सुरु असलेल्या गैरकारभाराची माहिती मी वेळोवेळी आमचे अध्यक्ष शरद पवार यांना देत आलो आहे. याच प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करावी अशी विनंती मी शरद पवार यांना केली होती. त्यानुसार आज आमची पंतप्रधानांसोबत भेट झाली. पंतप्रधानांनी आमचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्हाला आशा आहे की ते सकारात्मक प्रतिसाद देतील", असं मोहम्मद फैजल पी.पी म्हणाले.
शरद पवारांनी काय म्हणाले?
"पंतप्रधानांसोबत मी एकटा उपस्थित नव्हतो. मोहम्मद फैजल देखील उपस्थित होते आणि त्यांनी जी आता माहिती दिली. तिच त्यांनी स्वत: पंतप्रधानांना सांगितली. मी फक्त तिथं उपस्थित होतो. मीही दोन मुद्दे पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिले आहेत. यात महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्नाबाबत त्यांच्याशी बोललो आहे. अजूनही त्या आमदारांची नियुक्ती झालेली नाही हे त्यांच्या लक्षात आणून दिलं. तर दुसरं म्हणजे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर काल झालेल्या कारवाईचीही माहिती पंतप्रधानांना दिली", असं शरद पवार म्हणाले.
"संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि एका वृत्तपत्राचे संपादक आहेत. त्यांच्यावर कारवाई कोणत्या उद्देशानं केली. एका खासदारावर अशी कारवाई करण्यात आली आहे. त्याचं राहतं घर जप्त करण्यात आलं आहे. केंद्रीय यंत्रणांकडून ही कारवाई करण्यात आल्यानं त्याची माहिती पंतप्रधानांना दिली आहे", असं शरद पवार म्हणाले.