CM केजरीवालांना जामीन मिळताच शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, "एक गोष्ट स्पष्ट झाली की...";
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 11:41 AM2024-09-13T11:41:33+5:302024-09-13T11:59:42+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून मिळालेल्या जामीनावर प्रतिक्रिया दिली
Sharad Pawar : कथित मद्य घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे. मात्र, ही अटक कायदेशीर की बेकायदेशीर याबाबत दोन्ही न्यायाधीशांची मते भिन्न आहेत. १० लाखांच्या जातमुचलक्यावर अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईंया यांच्या न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यासोबतच अनेक अटी घातल्या आहेत. त्यानंतर आता १७७ दिवसांनी अरविंद केजरीवाल हे पुन्हा तुरुंगातून बाहेर येणार आहेत. केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णायामुळे अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अरविंद केजरीवाल सीबीआयने अटक केली होती. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी या अटकेला आव्हान देणारी आणि जामिनासाठी याचिका दाखल केली होती. खंडपीठाने ५ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकेवरील निकाल राखून ठेवला होता. याप्रकरणी शुक्रवारी निर्णय जाहीर करण्यात आला.
केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनावर शरद पवार यांनी एक्स सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून एक गोष्ट स्पष्ट झाली की देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे. इतक्या दिवसाचा लढा आज सत्याच्या मार्गाने निघाला. अधम मार्गाने एखाद्याला नामोहरम करण्याचा कट लोकशाही बुलंद असणाऱ्या देशात कधीच यशस्वी होणार नाही, अशी भावना केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून पक्की झाली," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून एक गोष्ट स्पष्ट झाली की देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे. इतक्या दिवसाचा लढा आज सत्याच्या मार्गाने निघाला. अधम मार्गाने एखाद्याला नामोहरम करण्याचा कट लोकशाही बुलंद असणाऱ्या देशात कधीच यशस्वी होणार नाही, अशी भावना…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 13, 2024
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या जामीनावरुन दोन्ही न्यायाधीशांची मते भिन्न आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केजरीवाल यांच्या अटकेचे समर्थन केले, तर न्यायमूर्ती भुईन्या यांनी ते मान्य केले नाही. आरोपपत्र दाखल झाले आहे आणि खटला नजीकच्या काळात पूर्ण होणार नाही, त्यामुळे त्याला जास्त काळ तुरुंगात ठेवण्याचे कोणतेही औचित्य नाही, असं कोर्टानं म्हटलं आहे. केजरीवाल यांच्या बाबतच्या या निर्णयापूर्वी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंह, बीआरएस नेत्या के कविता, आपचे संपर्क प्रभारी विजय नायर या आरोपींना कथित दारू घोटाळा प्रकरणात जामीन मिळाला आहे.
https://www.lokmat.com/poll/190/