“१४९ दिवसांचा लढा, सत्याचा विजय...”; हेमंत सोरेन यांच्या जामिनावर शरद पवारांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 09:41 PM2024-06-28T21:41:09+5:302024-06-28T21:41:49+5:30

Sharad Pawar Reaction On Hemant Soren Bail: हेमंत सोरेन यांना न्यायालयाने दिलेल्या जामीनामुळे सत्याचा विजय हा जास्त दूर नाही अशी भावना दृढ झाली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

sharad pawar reaction over hemant soren get bail from jharkhand high court | “१४९ दिवसांचा लढा, सत्याचा विजय...”; हेमंत सोरेन यांच्या जामिनावर शरद पवारांची प्रतिक्रिया

“१४९ दिवसांचा लढा, सत्याचा विजय...”; हेमंत सोरेन यांच्या जामिनावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar Reaction On Hemant Soren Bail: जमीन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोठा दिलासा मिळाला आहे. झारखंड उच्च न्यायालयाकडून हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर करण्यात आला. अंतरिम जामीन मिळण्यासाठी हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, तेव्हा हेमंत सोरेन यांना दिलासा मिळाला नव्हता. हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेमंत सोरेन यांनी जामिनासाठी झारखंड उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर १३ जून रोजी सुनावणी पूर्ण झाली होती. परंतु, तेव्हा उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणी पुन्हा घेण्यात आलेल्या सुनावणीत हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर करण्यात आला. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर काँग्रेस आक्रमक झाली होती. अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी केंद्रातील सरकारवर घणाघाती टीका केली होती. हेमंत सोरेन यांना जामीन मिळाल्यानंतर शरद पवार यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत भाष्य केले आहे. 

संविधानानुसार लोकशाहीची भरभराट होईल अशी कामगिरी करावी

झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजकीयदृष्ट्या प्रेरित खटल्यात तुरुंगवास भोगावा लागला. १४९ दिवसांच्या लढ्याला आज न्यायाचा मार्ग मिळाला. सोरेन यांना न्यायालयाने दिलेल्या जामीनामुळे सत्याचा विजय हा जास्त दूर नाही अशी भावना दृढ झाली आहे. एनडीए सरकारकडे आमची मागणी राहील, की सूड भावनेने कोणतीही कारवाई न होता संविधानानुसार लोकशाहीची भरभराट होईल अशी कामगिरी करावी. सत्यमेव जयते!, अशी पोस्ट शरद पवार यांनी केली आहे. 

दरम्यान, ईडीने रांचीमध्ये लष्कराच्या ताब्यात असलेल्या  जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीची चौकशी सुरू केली. या प्रकरणी ईडीने रांचीच्या बडागाईन झोनचे महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप प्रसाद यांना अटक केली होती. त्यांच्या राहत्या घरातून मोठ्या प्रमाणात सरकारी कागदपत्रे आणि मोबाईल  जप्त करण्यात आले होते. त्यानंतर ईडीने आपला मोर्चा हेमंत सोरेन यांच्याकडे वळवला. या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना ईडीने १४ आरोपींना अटक केली. या आरोपींनी सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने भूमाफियांच्या नावे फसवणूक करून भूखंड हस्तांतरित केल्याचं तपासात उघड झाले. यानंतर हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली. 
 

Web Title: sharad pawar reaction over hemant soren get bail from jharkhand high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.