शरद पवार यांना धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 09:55 PM2017-11-15T21:55:46+5:302017-11-15T21:59:14+5:30
महाराष्ट्रात अजित पवार, सुनिल तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असताना दुसरीकेड छगन भुजबळ कारागृहाची हवा खात असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी धक्का बसला आहे.
नवी दिल्ली - महाराष्ट्रात अजित पवार, सुनिल तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असताना दुसरीकेड छगन भुजबळ कारागृहाची हवा खात आहेत. आता केरळमध्येही पक्षाच्या मंत्र्याचे हात बेकायदेशीर कारवायांत बरबटले असल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. सत्तेत आल्यापासून डावी लोकशाही आघाडीच्या तीन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. केरळ उच्च न्यायालयाने कानउघडणी केल्यानंतर कॅबिनेट मंत्री थॉमस चंडी यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सरकारच्या जागेवर अतिक्रमण करून त्यावर बांधकाम केल्याचा ठपका चंडी यांच्यावर आहे. चंडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून आले आहेत. 2016 पासून डावी लोकशाही आघाडी केरळमध्ये सत्तेत आहे.
वाहतूक मंत्री चंडी यांच्या कंपनीने बांधकामांचे नियम धाब्यावर बसवून पार्किंग परिसरात बांधकाम केले आहे, असे आरोप आहेत. शिवाय, अलाप्पुझ्हा जिल्ह्यात असलेल्या त्यांच्या रिसॉर्टकडे जाण्यासाठी चंडींनी भाताच्या शेतीतून रस्ता तयार केला आहे, असाही आरोप आहे. चंडींच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी केरळ उच्च न्यायालयाने सुनावणी देत चंडींची कानउघडणी केली. त्यानंतर आज त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
(थॉमस चंडी )
मंगळवारी केरळ हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाला स्थगिती देण्याबाबत चंडी यांनी दाखल केलेली याचिका फेटाळाली होती. तुम्ही सत्तेत असताना सरकारच्याच अहवालाला आव्हान कसे देऊ शकता असा सवाल हायकोर्टाने विचारला होता. दुसरीकडे भाजपनेही चंडी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर बुधवारी सकाळी चंडी यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला. मुख्यमंत्र्यांनीही चंडी यांचा राजीनामा मंजूर केला.
थॉमस चंडी हे सर्वात श्रीमंत मंत्री म्हणून ओळखले जातात. राजीनाम्यानंतर चंडी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी परिवहन खाते राष्ट्रवादीकडेच ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. मी किंवा आमदार ए के ससिंद्रन यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत ते खाते रिक्त असेल असे त्यांनी सांगितले.