ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला शरद पवार यांचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 04:11 AM2020-01-01T04:11:01+5:302020-01-01T04:11:33+5:30
नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीला विरोध
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
ममता बॅनर्जी यांच्या एका पत्राचे उत्तर शरद पवार यांनी दिले आहे. यात म्हटले आहे की, आपली लोकशाही वाचविण्यासाठी आणि हुकूमशाही शासनाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी कोणत्याही योजनेत स्वत:ला सहभागी करून घेण्यात मला आनंद होईल. देशाला वाचविण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
ममता बॅनर्जी यांनी काय म्हटले आहे पत्रात?
ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांना २३ डिसेंबर रोजी हे पत्र लिहिले आहे.
यात भाजपचे शासन हे कठोर शासन असल्याचा उल्लेख करून म्हटले आहे की, आज आम्हाला पूर्वीपेक्षा अधिक एकजूटपणे या कठोर शासनाविरोधात उभे राहण्याची गरज आहे.
मी सर्व ज्येष्ठ नेत्यांना आणि सर्व राजकीय पक्षांना विनंती करते की, शांततेने विरोध करून भारताच्या लोकशाही आत्म्याला वाचवा.
देशातील अल्पसंख्याकांच्या अधिकाराबाबत काळजी व्यक्त करून म्हटले आहे की, या देशाचे नागरिक जात आणि पंथ व महिला व मुले, शेतकरी, कामगार आणि अनुसूचित जाती, जमातीचे नागरिक, ओबीसी आणि अल्पसंख्याक सदस्य हे नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीमुळे घाबरलेले असून, भीतीच्या छायेत आहेत.
शरद पवार यांनी म्हटले आहे की, हा कायदा धार्मिक, सामाजिक एकतेला नुकसान पोहोचवेल. त्यांनी असाही सवाल केला आहे की, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या स्थलांतरितांना नागरिकत्वासाठी परवानगी दिली आहे. मात्र, श्रीलंकेच्या तामिळींना नाही.