शरद पवारांची भाजपाविरोधी प्रमुखांसोबत दिल्लीत बैठक, फडणवीसांनी सांगितलं राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 02:04 PM2021-06-22T14:04:14+5:302021-06-22T14:05:38+5:30
कोणाला काय करायचं आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. पण, लोकांच्या मनात नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे, 2024 मध्येही आत्ताच्या जागांपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवून मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेस वगळता भाजप विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीआधी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीवर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. आता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकाली गंभीरतेनं घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.
कोणाला काय करायचं आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. पण, लोकांच्या मनात नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे, 2024 मध्येही आत्ताच्या जागांपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवून मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच, 2019 साली याहीपेक्षा जास्त पक्षाचे नेते पश्चिम बंगालमध्ये एकाच मंचावर हात वर करुन उभा होते. मात्र, त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही, त्यामुळे या बैठकांचाही कुठलाही परिणाम होणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले. दिल्लीत शरद पवार यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे, त्यासंदर्भात फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
शरद पवार यांच्या निवासस्थानी होत असलेल्या बैठकीला काँग्रेस वगळता इतर भाजप विरोधी पक्ष सहभागी होत आहेत. यात तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे लोकसभेच्या पुढील निवडणुकीत पवार तिसरी आघाडी तयार आहेत का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर एक अतिशय महत्त्वाचं विधान केलं आहे. 'माझा तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीवर विश्वास नाही. तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देईल यावर माझा विश्वास नाही,' असं किशोर यांनी म्हटलं आहे.
बैठकीबाबत स्पष्टीकरण
माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूलचे नेते यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रमंचची स्थापना केली आहे. याच राष्ट्रमंचच्या माध्यमातून शरद पवारांच्या निवासस्थानी दिल्लीत भाजप विरोधी पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली असताना राष्ट्रमंचाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 'लोकसभेच्या २०२४ मध्ये होत असलेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपला आव्हान देण्याच्या हेतूनं तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यासाठी ही बैठक होत नाहीए,' असं स्पष्टीकरण राष्ट्रमंचाकडून देण्यात आलं आहे.
पवार-किशोर यांच्यात दिल्लीत तीन सात बैठक
प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात सोमवारी दिल्लीत तीन तासांहून अधिक वेळ चर्चा झाली. गेल्या दोन आठवड्यातील ही दुसरी बैठक होती. याआधी पवार आणि किशोर मुंबईत 'सिल्व्हर ओक'वर ११ जूनला भेटले होते. ती भेटदेखील बराच वेळ सुरू होती. काल प्रशांत किशोर यांची भेट घेणार शरद पवार आज विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत मिशन २०२४ वर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.