राऊतांच्या उंचीवरील टीकेला प्रत्युत्तर दिलं, राणेंनी शरद पवारांच्या फोनचंही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 01:28 PM2021-07-08T13:28:18+5:302021-07-08T13:30:04+5:30

'नारायण राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. पण, त्या मंत्रीपदापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी. आमच्या त्यांना शुभेच्छा,' असे राऊत यांनी म्हटले होते

Sharad Pawar's call came, Narayan Rane also replied to sanjay Raut | राऊतांच्या उंचीवरील टीकेला प्रत्युत्तर दिलं, राणेंनी शरद पवारांच्या फोनचंही सांगितलं

राऊतांच्या उंचीवरील टीकेला प्रत्युत्तर दिलं, राणेंनी शरद पवारांच्या फोनचंही सांगितलं

googlenewsNext
ठळक मुद्देशरद पवार यांनी मला फोन केला, चांगलं काम करा, असे ते म्हणाले. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप मला शुभेच्छा दिलेल्या नाहीत. कारण त्यांचं मन एवढं मोठं नाही.

मुंबई - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी सायंकाळी पार पडला. त्यात महाराष्ट्रातून 4 खासदारांना मंत्रीपद देण्यात आले. त्यात भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राणेंच्या मंत्रीपदावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर, आता नारायण राणेंनी संजय राऊतांना प्रत्त्युत्तर दिलं आहे. तसेच, शरद पवार यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्याचेही त्यांनी सांगितले.  

'नारायण राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. पण, त्या मंत्रीपदापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी. आमच्या त्यांना शुभेच्छा,' असे राऊत यांनी म्हटले होते. त्यावर, नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'केंद्रीय मंत्रिपद ही मोठी जबाबदारी आहे. हे खातं महत्त्वाचं आहे. कोणतंही खातं हे छोटं किंवा मोठं नसतं... मी जेव्हा खात्याचा कार्यभार पाहीन आणि मी जेंव्हा या खात्याला न्याय देईन, तेव्हा संजय राऊतांना कळेल की हे खातं किती महत्त्वाचं आहे', असे नारायण राणेंनी म्हटलं आहे. 

शरद पवारांनी फोन करुन दिल्या शुभेच्छा

'शरद पवार यांनी मला फोन केला, चांगलं काम करा, असे ते म्हणाले. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप मला शुभेच्छा दिलेल्या नाहीत. कारण त्यांचं मन एवढं मोठं नाही. मला मंत्रीपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलेले नाही. मात्र, महाराष्ट्रातील सर्व विभागातून मला शुभेच्छा मिळाल्या, त्याच मी त्यांच्या वतीने शुभेच्छा समजतो, असेही नारायण राणेंनी म्हटले. 

काय म्हणाले संजय राऊत 

माध्यमाशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, बेरोजगारी, महागाई, आरोग्य या सगळ्या संदर्भात महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर जबाबदारी आली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रिपदे आली आहेत. पण, प्रकाश जावडेकरांसारखा अनुभवी आणि ज्येष्ठ असलेला मोहरा पडला. नक्कीच नारायण राणेंना मंत्री सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खाते दिले, पण राणेंची उंची त्यापेक्षा मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अनेक मंत्रीपदे भूषविली आहे. आता फक्त राणेंपुढे रोजगार वाढवण्याचे मोठे काम आहे. तसेच, मधल्या काळात लहान उद्योग मरून पडला होता. त्याला संजीवनी देण्याचे आव्हान राणेंसमोर आहे. रोजगार निर्मितीचे काम त्यांच्या पुढे आहे. हा व्यक्तिगत टीका टिप्पणीचा विषय नाही. राणे चांगले काम करतील. ते महाराष्ट्रात उद्योग आणतील असा विश्वासही राऊत यांनी बोलून दाखवला.
 

Web Title: Sharad Pawar's call came, Narayan Rane also replied to sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.