शरद पवारांची महाविकास आघाडी इतर राज्यांत जाण्यास उत्सुक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 04:50 AM2019-12-01T04:50:58+5:302019-12-01T04:55:01+5:30
बिहारातील नितीशकुमारांचा जदयू आणि रामविलास पासवान यांचा लोजपा, तसेच महाराष्ट्रातील रामदास आठवले यांचा रिपाइं यांच्याशी पहिल्यांदा संपर्क करण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विजयाने उत्साहित झालेली शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी इतर राज्यांतही जाणार असल्याचे वृत्त आहे. एनडीएविरोधातील आघाडीला देशव्यापी स्वरूप देण्यात येईल, असे खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच म्हटले आहे. मात्र, केवळ एनडीएविरोधातीलच नव्हे, तर एनडीएमधील असंतुष्ट पक्षांनाही आघाडीत घेण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे समजते.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, बिहारातील नितीशकुमारांचा जदयू आणि रामविलास पासवान यांचा लोजपा, तसेच महाराष्ट्रातील रामदास आठवले यांचा रिपाइं यांच्याशी पहिल्यांदा संपर्क करण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे. या पक्षांसोबतच्या बैठकीत सकारात्मक परिणाम येऊ शकतो, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांना वाटतो. फडणवीस यांनी रात्रीतून शपथ घेतली तेव्हा जदयूने नाराजी व्यक्त केली होती, हे आघाडीच्या नेत्यांच्या विश्वासामागील प्रमुख कारण आहे. रामदास आठवलेही सरकार स्थापनेच्या काळात सातत्याने शिवसेनेच्या संपर्कात होते. ते भाजपसाठी प्रयत्न करीत होते,
तरीही बहुमत ज्याच्याकडे आहे, त्याचेच सरकार बनावे, असे मत त्यांनी शिवसेना नेत्यांजवळ बोलून दाखविले होते. त्यामुळे आठवले यांनाही आज ना उद्या आघाडीत आणता येईल, असे आघाडीच्या नेत्यांना वाटते.
याशिवाय उत्तर प्रदेशातील सरकारचा सहयोगी पक्ष अपना दल यासह बसपा, सपा आणि लोकदल आपल्यासोबत येऊ शकतात, असे आघाडीला वाटते. शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यास हे पक्ष सोबत येऊ शकतात, असे आघाडीच्या नेत्यांना वाटते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी केंद्राच्या विरोधात आघाडीत येऊ शकतात, असेही नेत्यांना वाटते.
ही केवळ सत्याची सोबत
जदयूच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, महाराष्ट्रात बहुमताला डावलण्यात आले तेव्हा आम्ही सत्य बोलण्याचे काम केले. हा विरोध एनडीए अथवा फडणवीस सरकारला नव्हता. ही केवळ सत्याची सोबत होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना शरद पवार पूर्वीपासून जाणतात. त्यांच्याकडून काही प्रस्ताव आला तर विचार होऊ शकतो. मात्र, त्यापुढील रणनीती नितीशकुमार हेच ठरवतील.