Sharad Ponkshe: "हिंदूंनो जागे व्हा"... उदयपूर टेलर हत्याकांडानंतर शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 03:00 PM2022-06-29T15:00:08+5:302022-06-29T15:10:25+5:30
राजस्थानच्या उदयपूरमध्ये काही कट्टरपंथीयांकडून टेलर व्यावसायिक कन्हैया लालचा गळा चिरून खून करण्यात आला
मुंबई - मराठी सिनेसृष्टीतील प्रतिभावान अभिनेता शरद पोंक्षे (sharad ponkshe) सामाजिक मुद्द्यावरुनही नेहमीच चर्चेत असतात. आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे शरद पोंक्षे कायमच आपलं मत रोखठोक, निर्भीडपणे मांडत असतात. त्यामुळे कलाविश्वापासून ते राजकीय घडामोडींवर ते बिंधास्त व्यक्त होतात. राज्यातील राजकीय घडामोडींवेळी त्यांनी केलेल्या पोस्टमुळे ते चर्चेत असतानाच, आता उदयपूर मर्डर प्रकरणावर त्यांनी सोशल मीडियातून पोस्ट केली आहे.
राजस्थानच्या उदयपूरमध्ये काही कट्टरपंथीयांकडून टेलर व्यावसायिक कन्हैया लालचा गळा चिरून खून करण्यात आला. मंगळवारी दुपारी कपड्याच माप देण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद यांनी टेलर कन्हैयालालची निर्घृण हत्या केली. त्यानंतर, देशभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहेत. सोशल मीडियातूनही या दोन्हांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. आता, अभिनेता शरद पोंक्षे यांनीही यासंदर्भात पोस्ट केली आहे.
'जे उदयपूरमध्ये घडलं ते पाहिल्यावर स्वा. सावरकर आणि त्यांचे विचार पदोपदी आठवतात. हिंदूंनो जागे व्हा.', असे म्हणत पोंक्षे यांनी सावकरांच्या कवितेतील काही ओळी शेअर केल्या आहेत. 'प्रेयसीच्या केसातून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरुन फिरु लागली तर आणि तरच कदाचित हा हिंदुस्तान जगू शकेल', असा सावरकरांचा विचार पोंक्षे यांनी इंस्टाग्रामवरुन शेअर केला आहे.
राजकीय घडामोडींसंदर्भातही पोस्ट
पोंक्षे यांनी काही काळापूर्वीच त्यांनी कर्करोगावर मात करत पुन्हा एकदा कलाविश्वात कमबॅक केलं आहे. कर्करोगाशी दिलेल्या या लढ्याचं वर्णन त्यांनी 'दुसरं वादळ' या पुस्तकात केलं आहे. या पुस्तकात त्यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख केला होता. परंतु, शरद पोंक्षे यांची ही पोस्ट पाहून आदेश बांदेकर नाराज झाले आणि त्यांच्यात ट्विटर वॉर सुरु झाले. शरद पोंक्षे यांना आदेश व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मदतीचा विसर पडला असा समज आदेश बांदेकरांचा झाला होता. त्यानंतर, हा गैरसमज दूर करण्यासाठी शरद पोंक्षे यांनी पुस्तकाचं पान शेअर करत आपल्या पुस्तकात आदेश बांदेकरच्या मदतीचा उल्लेख केल्याचं सांगितलं.