शरद यादव जनता दल (यू)मध्ये परत येण्याची शक्यता; राजकारणाला वेगळे वळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 12:53 AM2020-09-06T00:53:26+5:302020-09-06T00:55:52+5:30
विधानसभा निवडणूक
पाटणा : आगामी बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान अवाम मोर्चा (एस) या पक्षाचे अध्यक्ष जितनराम मांझी हे एनडीएमध्ये पुन्हा परतल्यानंतर आता शरद यादवही जनता दलात (यू) परत येण्याची शक्यता निर्माण झालीआहे.केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान अध्यक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षाशी जनता दलचा (यू) सध्या संघर्ष सुरू आहे. दोन्ही पक्ष एनडीएचाच भाग असले तरी त्यांचे सध्या फारसे पटत नाही.
२४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीतील जागा वाटपात आपल्या वाट्याला अधिक जागा याव्यात, यासाठी एनडीएतील लोकजनशक्ती पक्ष, जनता दल (यू), तसेच भाजपमध्ये छुपी स्पर्धा आहे. जागावाटपाची बोलणी सुरू व्हायला अद्याप बराच काळ बाकी असला तरी त्याआधीच या पक्षांत लठ्ठालठ्ठी सुरू झाली आहे.
चिराग यांचा धूर्तपणा
बिहारमधील एनडीएचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नितीशकुमारच असतील, हे भाजपने याआधीच स्पष्ट केले आहे. जितनराम मांझी यांना एनडीएमध्ये परत आणल्यानंतर पुढची रणनीती ठरविण्यासाठी लोकजनशक्ती पक्षाने लवकरच एका बैठकीचे आयोजन केले आहे. नितीशकुमार यांच्यावर टीका करताना दुसऱ्या बाजूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्याचा धूर्तपणा लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी दाखविला आहे.