अध्यक्षपद सांभाळण्यास शरद यादव अनिच्छुक
By Admin | Published: April 4, 2016 10:24 PM2016-04-04T22:24:34+5:302016-04-04T22:24:34+5:30
संयुक्त जनता दलाच्या (संजद) १० एप्रिल रोजी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत पक्षाचा नवा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाच्या (संजद) १० एप्रिल रोजी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत पक्षाचा नवा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. विद्यमान अध्यक्ष शरद यादव यांनी चौथ्यांदा पक्षाध्यक्षपद न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे १० एप्रिलला यादव यांचा दहा वर्षांचा कार्यकाळही समाप्त होईल.
‘शरद यादव यांनी लागोपाठ तीनवेळा पक्षाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे आणि आता अध्यक्षपदी चौथ्यांदा आपली निवड करण्यासाठी पक्ष घटनेत दुरुस्ती करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे,’ असे संजदचे प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. शरद यादव हे संजदच्या संस्थापकांपैकी एक आहेत. सर्वप्रथम २००६ मध्ये त्यांची पक्षाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर २०१३ मध्ये पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करून त्यांना तिसऱ्यांदा दोन वर्षांसाठी पक्षाध्यक्ष बनविण्यात आले होते.
संजदचा नवा पक्षाध्यक्ष कोण राहील, यावरून पक्षात मतभेद आहेत. बिहारबाहेर आपली ताकद दाखविण्यास इच्छुक असलेले मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.