बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यांनाच शरद यादवांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 10:12 AM2020-02-20T10:12:51+5:302020-02-20T10:14:28+5:30
रालोसपा पक्षाचे प्रमुख आणि माजी केंद्रीयमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे नेते शरद यादव यांना महाआघाडीचा चेहरा म्हणून समोर करण्याची मागणी केली होती.
नवी दिल्ली - माजी केंद्रीयमंत्री शरद यादव यांनी लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हेच विरोधी पक्षाचे नेते असल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यात राष्ट्रीय जनता दलच सर्वात मोठा पक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले. शरद यादव महाआघाडीचे नेते असून त्यांच्या या वक्तव्यामुळे महाआघाडीचा चेहरा म्हणून तेजस्वी समोर येणार अस दिसत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत आपण महाआघाडीचा चेहरा नसल्याचे यादव यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी महाआघाडीकडून तेजस्वी यादव हेच पुढं येणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी शरद यादव यांनी तिसऱ्या आघाडीची शक्यता फेटाळून लावताना विरोधकांचा एकोपा होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. तरच बिहारमध्ये विजय मिळू शकतो. या संदर्भात आपलं लालू प्रसाद यादव यांच्याशी बोलण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
रालोसपा पक्षाचे प्रमुख आणि माजी केंद्रीयमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे नेते शरद यादव यांना महाआघाडीचा चेहरा म्हणून समोर करण्याची मागणी केली होती. या संदर्भात जीतन मांझी, उपेंद्र कुशवाह, शरद यादव आणि मुकेश सहनी यांची गुप्त बैठकही झाली होती. या बैठकीनंतर बिहारमध्ये तिसरी आघाडी समोर येणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती.