सपाच्या अधिवेशनात शरद यादवांची हजेरी
By admin | Published: October 9, 2014 03:19 AM2014-10-09T03:19:42+5:302014-10-09T03:19:42+5:30
उत्तर प्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्षाचे नववे राष्ट्रीय अधिवेशन बुधवारपासून सुरू झाले़ या अधिवेशनात जनता दल (युनायटेड) अर्थात जदयू प्रमुख शरद यादव
लखनौ : उत्तर प्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्षाचे नववे राष्ट्रीय अधिवेशन बुधवारपासून सुरू झाले़ या अधिवेशनात जनता दल (युनायटेड) अर्थात जदयू प्रमुख शरद यादव यांनी लावलेल्या हजेरीमुळे सर्वांच्याच भुवया ताणल्या गेल्या़ त्यांच्या उपस्थितीने सपा-जदयू आघाडीच्या चर्चेला आणखीच ऊत आला़ संकटाच्या घडीत समाजवाद्यांनी कायम एकजूटतेचे दर्शन घडवले आहे, असे शरद यादव यावेळी म्हणाले़
सपाप्रमुख मुलायमसिंग यादव यांच्या निमंत्रणावरून शरद यादव लखनौला पोहोचले़ मुलायमसिंग यांच्यासोबत एकाच व्यासपीठावरून बोलताना त्यांनी सपा-जदयू आघाडीवर थेट भाष्य करणे टाळले़ पण त्यांचे भाषण आघाडीच्या शक्यतांना बळ देणारे ठरले़
देशावर संकट येते तेव्हा तेव्हा समाजवादी एक होतात, असे ते म्हणाले़ मुलायमसिंग यांच्यासोबतच्या संबंधांवर भाष्य करताना, आमच्यात रक्ताचे नाते नाही पण विचाराचे नाते जरूर आहे, असे ते म्हणाले़
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख टाळत त्यांनी त्यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले़ सत्तेत असणाऱ्यांनी बोलण्यापेक्षा काम करावे़
केंद्रातील विद्यमान सरकारने केवळ स्वप्नांचा बाजार मांडला आहे, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली़ यावेळी त्यांनी स्वच्छ भारत अभियानावरही टीका केली़ एक दिवस झाडू हातात घेऊन रस्ता झाडल्याने भारत स्वच्छ होणार नाही़ आधीचे संपुआ सरकार आणि आत्ताचे रालोआ सरकार एकाच माळेचे मणी असल्याचे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)