मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 3 जणांचा मृत्यू; भाजप आमदाराच्या घरात IED ब्लास्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 07:42 PM2023-06-09T19:42:51+5:302023-06-09T19:43:14+5:30
CBI ने हिंसाचाराच्या चौकशीसाठी DIG दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन केले.
इंफाळ : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार अजून शमलेला नाही. आज पुन्हा एकदा मणिपूरच्या कुकी बहुल गावात हिंसाचार झाला, ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला.
दुसरीकडे, गुरुवारी भाजप आमदाराच्या घरी आयईडी स्फोट झाल्याची बातमीही समोर आली. दोन जण दुचाकीवरुन आले आणि त्यांनी ही घटना घडवली. या घटनेमुळे भाजप नेत्याच्या घराच्या गेटचे नुकसान झाले आहे. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या गावात ही घटना घडली ते गाव पूर्णपणे कुकीबहुल आहे. हे गाव कांगपोकपी आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांच्या सीमेला जोडलेले आहे.
हिंसाचारात 105 जणांचा मृत्यू
राज्यात कुकी आणि मेईतेई यांच्यातील संघर्षात आतापर्यंत 105 लोकांचा मृत्यू झाला आहे. इंफाळ खोऱ्यात 3 मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये राहणारे आदिवासी मेईतेई आणि कुकी समुदायामध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून 40,000 लोक विस्थापित झाले आहेत. मेईतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिल्यानंतर हा हिंसाचार उसळला आहे. वाढत्या चकमकींच्या पार्श्वभूमीवर राज्यात अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले.
CBI कडून SIT ची स्थापना
CBI ने शुक्रवारी मणिपूरमधील हिंसाचाराच्या चौकशीसाठी DIG दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी 6 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. यातील पाच गुन्हेगारी कटाचे आहेत, तर एक सामान्य कटातील आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याच्या दौऱ्यात हिंसाचाराची सीबीआय चौकशी करणार असल्याची माहिती दिली होती. यावेली शहांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग, कुकी, मेईतेई समाज आणि इतरांच्या वेगवेगळ्या वेळी बैठका घेतल्या. शहा यांनी लोकांना शांततेचे आवाहनही केले.