25 वर्षांपूर्वी 'या' कंपनीत दहा हजार गुंतवले असते तर आता तुम्ही झाला असता करोडपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 04:58 PM2018-06-14T16:58:06+5:302018-06-14T16:58:06+5:30
त्यावेळी इन्फोसिसच्या आयपीओला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता.
भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांपैकी एक असणाऱ्या इन्फोसिसच्या शेअर बाजारातील प्रवेशाला यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत. 1981 साली एका खोलीत तब्बल 15 हजार रुपयांच्या भांडवलावर इन्फोसिसची सुरुवात झाली. 1993 साली इन्फोसिसने भांडवली बाजारात प्रवेश केला. तेव्हा या कंपनीचे भांडवली मूल्य 50 लाख डॉलर्सवर पोहोचले होते. त्यावेळी कंपनीला IPO मार्फत 16.5 कोटी रूपये भांडवल उभारण्याची अपेक्षा होती. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यावेळी इन्फोसिसचे शेअर्सची मूळ किंमत प्रत्येकी 95 रूपये इतकी होती. मात्र, हे शेअर्स 50 टक्के प्रीमियमसह म्हणजे 145 रूपये प्रत्येकी या दराने विकले गेले होते. इन्फोसिसची भांडवली बाजारपेठेत नोंदणी झाली त्यादिवशी या शेअर्सची किंमत साधारण 160 रूपयांवर पोहोचली होती.
त्यावेळी 50 लाख डॉलर्स इतके भाग भांडवल असलेल्या इन्फोसिसचे आताचे भागभांडवल 109 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचले आहे. याचा ढोबळमानान हिशेब करायचा झाल्यास गुंतवणुकदारांनी त्यावेळी आयपीओमध्ये 10 हजार गुंतवले असतील तर आता त्याचे मूल्य 2.5 कोटींवर पोहोचले आहे. सध्याच्या घडीला इन्फोसिस ही प्रमुख भारतीय कंपन्यांपैकी एक म्हणून एक ओळखली जाते. सुरूवातीला अवघे 250 कर्मचारी असलेल्या इन्फोसिसमध्ये सध्या 2 लाख कर्मचारी काम करत आहेत.