रामाची गाणी, भजने हॅशटॅगसह करा शेअर; पंतप्रधानांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 06:10 AM2024-01-01T06:10:58+5:302024-01-01T06:11:41+5:30
पंतप्रधान मोदी ‘मन की बात' या कार्यक्रमात म्हणाले की, ‘श्रीराम भजन' या हॅशटॅगमुळे प्रभू श्रीरामाशी संबंधित रचना भक्तिभावाच्या लाटा तयार करतील आणि त्यात प्रत्येकजण प्रभू श्री रामाच्या आदर्शांमध्ये न्हाऊन निघेल.
नवी दिल्ली : ‘अयोध्येतील राममंदिरावरून देशभरात प्रचंड उत्साह आहे, त्यामुळे श्रीरामाशी संबंधित गाणी, भजने ‘श्रीराम भजन' या हॅशटॅगसह सोशल मीडियावर शेअर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लोकांना केले.
पंतप्रधान मोदी ‘मन की बात' या कार्यक्रमात म्हणाले की, ‘श्रीराम भजन' या हॅशटॅगमुळे प्रभू श्रीरामाशी संबंधित रचना भक्तिभावाच्या लाटा तयार करतील आणि त्यात प्रत्येकजण प्रभू श्री रामाच्या आदर्शांमध्ये न्हाऊन निघेल.
#ShriRamBhajan सह शेअर करा -
या ऐतिहासिक क्षणात कलाविश्व स्वत:च्या खास शैलीत सहभागी होताना दिसत आहे. आपण सर्व अशा सर्व निर्मिती एका सामायिक हॅशटॅगसह शेअर करू शकतो का? मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही तुमची निर्मिती ‘श्रीराम भजन’ (#shriRamBhajan) या हॅशटॅगसह सोशल मीडियावर शेअर करा,’असे आवाहनही मोदी यांनी केले.
ठरलं... अशी असेल गाभाऱ्यातील मूर्ती -
अयोध्येतील श्री राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापन होणाऱ्या रामलल्लांच्या मूर्तीची रविवारी अंतिम निवड झाली. ५१ इंच उंचीची उभी मूर्ती ५ वर्षांच्या रामलल्लांच्या स्वरुपात असेल.
त्यापैकी पांडे यांची मूर्ती संगमरवरची, तर अन्य दोन मूर्ती कर्नाटकच्या निळ्या पाषाणातून तयार केल्या होत्या. त्यापैकी ३७ वर्षीय योगीराज यांनी तयार केलेल्या मूर्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
८ फुटाच्या कमळाच्या फुलात रामाची मूर्ती विराजमान असेल. ती कर्नाटकमधील निळ्या पाषाणातून मूर्तीकार योगीराज यांनी घडविली आहे.
रामलल्लांच्या मूर्तीसाठी तीन प्रस्ताव आले होते. त्या मूर्तीकार गणेश भट्ट, अरुण योगीराज आणि सत्यनारायण पांडे यांनी घडविल्या होत्या.