शरीफ यांनी आळवला काश्मीरचा राग
By admin | Published: November 17, 2015 02:45 AM2015-11-17T02:45:59+5:302015-11-17T02:45:59+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ‘दुखतरण-ए- मिल्लत’ या महिला फुटीरवादी संघटनेची नेता आसिया इंद्राबी हिला पत्र पाठवून काश्मीरबाबत अवलंबलेल्या भूमिकेची प्रशंसा
श्रीनगर : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ‘दुखतरण-ए- मिल्लत’ या महिला फुटीरवादी संघटनेची नेता आसिया इंद्राबी हिला पत्र पाठवून काश्मीरबाबत अवलंबलेल्या भूमिकेची प्रशंसा केली आहे. इंद्राबी हिने शरीफ यांना पत्र पाठवून पाकिस्तान सरकारला नैतिक, राजकीय आणि राजनैतिक स्तरावर समर्थन जाहीर केले होते.
काश्मीर मुद्यावर संयुक्त राष्ट्राने पारित केलेला ठराव कालबाह्य झाल्याचे म्हणणे योग्य ठरत नाही. या ठरावांची त्वरित अंमलबजावणी केली जावी, असे आवाहन शरीफ यांनी केले आहे. पाकिस्तान सरकारने काश्मीरबाबत अवलंबलेल्या भूमिकेबद्दल इंद्राबी हिने समाधान व्यक्त केले होते. या पत्राला उत्तर पाठविताना शरीफ यांनी तिच्या भूमिकेची प्रशंसा केली. सध्याच्या रणनीतीबाबत विश्वास दाखविणे ही बाब माझ्यासाठी समाधानाची आहे.
पाकिस्तान केवळ सीमावाद म्हणून काश्मीर मुद्याकडे बघत नाही. १९४७ च्या फाळणीच्या वेळी झालेल्या कराराच्या अंमलबजावणीशी हा मुद्दा निगडित आहे, असेही शरीफ यांनी या पत्रात नमूद केले. (वृत्तसंस्था)