शरीफ बरळले!

By admin | Published: October 11, 2016 05:02 AM2016-10-11T05:02:09+5:302016-10-11T05:02:09+5:30

काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणाऱ्या हजारो तरुणांना दहशतवादी असे हिणवून भारत मोठीच चूक करीत आहे. आम्ही भारतातील

Sharif is upset! | शरीफ बरळले!

शरीफ बरळले!

Next

इस्लामाबाद : काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणाऱ्या हजारो तरुणांना दहशतवादी असे हिणवून भारत मोठीच चूक करीत आहे. आम्ही भारतातील काश्मिरी जनतेच्या स्वातंत्र्य लढ्याला यापुढेही पाठिंबा देत राहू, असे प्रतिपादन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी इस्लामाबादमध्ये केले.
पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज)च्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना नवाज शरीफ म्हणाले की, काश्मिरी जनतेच्या लढ्याला आम्ही आजपर्यंत कायम पाठिंबा दिला आहे आणि जगातील कोणतीही ताकद आम्हाला तसा पाठिंबा देण्यापासून रोखू शकत नाही, हे भारताने लक्षात ठेवायला हवे. स्वातंत्र्य लढ्यातील तरुणांना दहशतवादी म्हणून, त्यांच्यावर अत्याचार, अन्याय केला जात आहे, गोळीबार करून शेकडो तरुण, वृद्ध व लहान मुलांना ठार मारले जात आहे. तरीही भारतीय काश्मीरमधील जनतेने आपला लढा थांबवलेला नाही.
उरी येथील लष्करी तळावर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी घुसून केलेला सर्जिकल स्ट्राइक आणि त्यात मारलेले दहशतवादी तसेच पाकिस्तानी सैनिक यामुळे नवाज शरीफ अडचणीत आले आहेत. त्यामुळेच त्यांनी गेल्या आठवड्यात संसदेचे अधिवेशन बोलावून, भारतविरोधी ठराव मंजूर करवून घेतला. सारा देश, सर्व विरोधी पक्ष आपल्यासमवेत आहेत, हे जगाला भासवण्यासाठी त्यांनी हे केले. मात्र इम्रान खान आणि त्यांचा पक्ष सातत्याने नवाज शरीफ यांच्यावर अपयशाचे आरोप करीत आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात इम्रान खान यांच्या पक्षाचे खासदार सहभागीही झाले नव्हते.
त्यामुळे त्यांना राजकीयदृष्ट्या उत्तर देण्यासाठी नवाज शरीफ यांनी आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत इम्रान खान यांच्यावरही टीका केली. काही मंडळींना देश अपंग झाल्याचे पाहायचे आहे. पण आपण तसे अजिबात होउ देणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा देत पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले की, पाकिस्तानातील दहशतवाद संपविण्यास आपण बांधील आहोत. देशाच्या काही भागांत विजेची तीव्र टंचाई भासत असून, ती दूर करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. (वृत्तसंस्था)
३0 आॅक्टोबर रोजी इस्लामाबाद बंद-
इम्रान खान यांच्या पक्षाने नवाज शरीफ यांचा भ्रष्टाचार आणि त्यांना आलेले अपयश जनतेपुढे मांडण्यासाठी ३0 आॅक्टोबर रोजी इस्लामाबाद बंदचे आवाहन केले आहे. त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी चर्चा तिथे सुरू आहे. त्यामुळे इम्रान खान यांना शह देण्यासाठी नवाज शरीफ सक्रिय झाले असून, त्यासाठीच त्यांनी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती.
मसूदची पाठराखण, पण ‘एनएसजी’वर चर्चा
बीजिंग : राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत भेटीच्या तोंडावर ‘न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप’मध्ये (एनएसजी) प्रवेश देण्याच्या संदर्भात भारताशी चर्चा करण्याची चीनने सोमवारी तयारी दर्शविली. मात्र दहशतवादविरोधी लढ्याचे कोणीही राजकारण करण्यास आपला विरोध आहे, असे सांगून ‘जैश-ए- मोहम्मद’चा प्रमुख मसूद अजहर याचा घोषित दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्याचा विषय संयुक्त राष्ट्र संघात रोखून धरण्याच्या आपल्या निर्णयाचे चीनने समर्थन केले.
गोव्यात होणाऱ्या ‘ब्रिक्स’ देशांच्या शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष शी याच आठवड्यात भारतात जाणार आहेत. या दौऱ्याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत चीनचे उप परराष्ट्रमंत्री लि बाओडाँग यांनी ‘एनएसजी’ आणि मसूदच्या मुद्द्यावर आपल्या देशाची भूमिका स्पष्ट केली. भारताने थेट चीनचे नाव घेतले नसले तरी ४८ देशांच्या ‘एनएसजी’ गटात भारताच्या प्रवेशात चीनने खोडा घातल्याचे मानले जाते.
लि यांनी असेही सांगितले की, ‘एनएसजी’मधील भारताच्या प्रवेशाच्या संदर्भात सर्व शक्यता आजमावून पाहण्यास आमची ना नाही. पण हे सर्व ‘एनएसजी’च्या प्रस्थापित नियम आणि प्रक्रियांनुसारच व्हायला हवे. नियम सर्वांनीच पाळायला हवेत, हिच चीनची सातत्याने भूमिका राहिली आहे.

Web Title: Sharif is upset!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.