दिल्ली दंगलीतील आरोपी शर्जील इमामला धक्का, सर्वोच्च न्यायालयाचा जामीन देण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 03:33 PM2024-10-25T15:33:16+5:302024-10-25T15:33:42+5:30
Sharjeel Imam Bail Hearing: शर्जील इमामविरुद्ध UAPA कलम 13 आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे.
Delhi Riots 2020 Case : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात 2020 साली झालेल्या दिल्ली दंगलीतील आरोपी शर्जील इमामला (Sharjeel Imam) जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. पण, दिल्ली उच्च न्यायालयास शर्जीलच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याच्या सूचनाही एससीने केल्या आहेत. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि एससी शर्मा यांच्या खंडपीठाने हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असून, थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे योग्य नसल्याचे सांगितले.
दरम्यान, शर्जील इमामविरुद्ध UAPA कलम 13 आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. देशद्रोहाच्या खटल्यात शर्जील इमामला दिल्ली उच्च न्यायालयातून यापूर्वीच जामीन मिळाला आहे.
Supreme Court refuses to entertain Article 32 plea by Sharjeel Imam but asks Delhi High Court to expedite bail hearing
— Bar and Bench (@barandbench) October 25, 2024
Read story here: https://t.co/duqQajZIXQpic.twitter.com/Zx8phGk4I1
शर्जीलचे वकील वरिष्ठ अधिवक्ता सिद्धार्थ दवे शर्जीलची जामीन याचिका 2022 पासून प्रलंबित असल्याचे म्हटले. तसेच, उच्च न्यायालयातील सुनावणी गेल्या दोन वर्षांत अनेकवेळा पुढे ढकलण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. यावर 25 नोव्हेंबरला हे प्रकरण हायकोर्टात नोंदवले जाईल, असे न्यायमूर्तींनी सांगितले. खंडपीठाने म्हटले की, राज्यघटनेच्या कलम 32 अन्वये दाखल केलेली ही रिट याचिका आहे, त्यामुळे आम्ही त्यावर विचार करण्यास इच्छुक नाही. पण, याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाला जामीन याचिकेवर जलदगतीने सुनावणी करण्याची विनंती करण्यास स्वातंत्र्य असेल.
कोण आहे शर्जील इमाम
शर्जील इमाम बिहारच्या जहानाबादचा रहिवासी असून, त्याने आयआयटी बॉम्बेमधून बीटेक, एमटेकचे शिक्षण घेतले आहे. यानंतर, त्याने दोन वर्षे बंगळुरूमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत डेव्हलपर म्हणून काम केले. त्यानंतर 2013 मध्ये मॉर्डन हिस्ट्रीमध्ये मास्टर्स करण्यासाठी जेएनयूमध्ये प्रवेश घेतला. येथून त्याने एमफिल आणि पीएचडीही केली. शर्जील इमामवर 2020 साली नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात झालेल्या दिल्लीतील दंगलीदरम्यान जामिया परिसर आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप आहे.