सोशल मीडियावर शशी कपूरऐवजी शशी थरूर यांना वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 10:47 AM2017-12-05T10:47:14+5:302017-12-05T12:08:48+5:30
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घालणाऱ्या अभिनेते शशी कपूर यांचं सोमवारी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं.
मुंबई- आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घालणाऱ्या अभिनेते शशी कपूर यांचं सोमवारी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली, पण श्रद्धांजली वाहण्याच्या नादात काहींनी चुकून काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनाही श्रद्धांजली वाहिली. थरूर यांच्या कार्यालयात सांत्वन करणारे फोन येऊ लागल्यानंतर शेवटी कंटाळून शशी थरूर यांनी ट्विट करत माझ्या मरणाच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्या तरी मी ठणठणीत बरा आहे, अशा आशयाचं ट्विट करत लोकांना चूक निदर्शनास आणून दिली.
I feel a part of me is gone. A great actor, smart, cosmopolitan, impossibly handsome & w/a name that was often confused w/mine. (My office got two calls from journalists today about my reportedly serious ill-health!) I will miss #ShashiKapoor. Condolences2his family&all his fans pic.twitter.com/fSz3jafPZJ
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) December 4, 2017
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शशी कपूर यांच्याऐवजी शशी थरूर यांच्या निधनाची बातमी दिली. यामुळे सगळा घोळ झाला. ट्विटरवरील त्याबातमीनंतर शशी थरूर यांच्या कार्यालयात अनेकांनी फोन केले.
शेवटी ट्विट करत ‘मी ठणठणीत बरा आहे, माझ्या कार्यालयात अनेक पत्रकारांचे फोन येत आहे. सांत्वन करणारेही फोन येत आहे. पण, मी अजूनही जिवंत आहे. मला वाटतं आता फक्त माझ्या शरीराचा एक भाग निकामी झाला आहे. एका चांगल्या, देखण्या चतुरस्त्र अभिनेत्याचं आज निधन झालं, माझं आणि त्यांचं नाव एकसारखं असल्यानं नेहमीच लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. पण, मला शशी कपूर यांची आठवण नेहमीच येत राहिल.’ अशा आशयाचं ट्विट करत त्यांनी आपल्या निधनाच्या बातमीला पूर्णविराम लावला.
अभिनेते शशी कपूर यांच्या पार्थीवावर मंगळवारी दुपारी १२ वाजता सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत, शशी कपूर यांनी १६0 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यापैकी १२ चित्रपट इंग्रजी भाषेतील आहेत. नव्वदीच्या दशकापासून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे कमी केले होते. त्यानंतर त्यांचे फारसे चित्रपटही आले नाही.कपूर यांच्या पत्नी जेनिफर यांचे १९८४ मध्ये कर्करोगाच्या आजाराने निधन झाल्यानंतर ते काहीसे खचले. त्यानंतर त्यांची प्रकृतीही खालावली. तेव्हापासून ते चित्रपटसृष्टीपासून दूर होते. २0११ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २0१५ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.