Shashi Tharoor : "ही मुलगी व्यवस्थेला कंटाळली, लढून-लढून थकली"; शशी थरूर यांच्या पोस्टने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 10:50 AM2024-08-08T10:50:02+5:302024-08-08T11:01:45+5:30
Shashi Tharoor And Vinesh Phogat : शशी थरूर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत एक पोस्ट केली आहे. जी सर्वांचंच लक्ष वेधू घेत आहे.
भारतीय कुस्तीपटूविनेश फोगट हिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या ५० किलो गटाच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. मात्र अंतिम सामन्यापूर्वी वजन जास्त असल्यामुळे अपात्र ठरली आहे. याच दरम्यान आता काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शशी थरूर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत एक पोस्ट केली आहे. जी सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. "ही मुलगी या व्यवस्थेला कंटाळली आहे, ही मुलगी लढून-लढून थकली आहे" असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे. विनेश फोगटने निवृत्ती जाहीर केली आहे. तिच्या या निर्णयामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. विनेशचे काका महावीर फोगट यांनीही निवृत्तीच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली असून हा निर्णय मागे घेण्याबाबत सांगितलं आहे.
इस सिस्टम से पक गई है ये लड़की
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) August 8, 2024
लड़ते-लड़ते थक गई है ये लड़की...#SorryVinesh! https://t.co/PkAGIqv1HWpic.twitter.com/59N38rT3Lx
"विनेशला समजावून सांगू की निवृत्त होऊ नकोस..."
विनेश फोगटलाकुस्ती शिकवणारे तिचे काका महावीर फोगट म्हणाले की, "विनेश जेव्हा येईल तेव्हा ते तिला समजावून सांगतील की तिला अजून खेळायचं आहे आणि तिने निवृत्तीचा हा मोठा निर्णय बदलावा. आम्ही तिला हिंमत हारू नकोस असं सांगू आणि आतापासून २०२८ च्या ऑलिम्पिकची तयारी सुरू करू."
विनेशने निवृत्तीचा हा निर्णय तडकाफडकी का घेतला, असं विचारलं असता? यावर महावीर फोगट म्हणाले की, कोणताही खेळाडू जेव्हा या पातळीपर्यंत पोहोचतो आणि नंतर अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा तो रागाच्या भरात असे निर्णय घेतो. ५० किलो कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी वजन जास्त असल्याने विनेश फोगटला बुधवारी ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं.