“कोण म्हणतं की लोकसभा कामासाठी आकर्षक जागा नाही”; महिला खासदारांसोबत फोटो काढत थरुरांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 04:16 PM2021-11-29T16:16:38+5:302021-11-29T16:17:30+5:30
लोकसभेच्या सहा महिला खासदारांसोबतचा एक फोटो शशी थरूर यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे हे ट्विट चर्चेत आले आहे.
नवी दिल्ली: दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. कृषी कायद्यासोबत पॅगेसस आणि अन्य मुद्द्यांवरून संसदेचे हिवाळी अधिवेशन चांगलेच गाजेल, असे सांगितले जात आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचे एक ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लोकसभेच्या सहा महिला खासदारांसोबतचा एक फोटो शशी थरूर यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे हे ट्विट चर्चेत आले आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी शशी थरुर यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन एक फोटो ट्विट केला आहे. यामध्ये थरुर हे सहा महिला खासदारांसोबत दिसून येत आहेत. फोटोमध्ये सर्वांत पुढे उभ्या असलेल्या माहिला खासदाराने हा सेल्फी फोटो काढल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही दिसत आहेत. सुप्रिया सुळेंसोबतच पतियालाच्या खासदार परनित कौर, खासदार आणि बंगालच्या अभिनेत्री नुसरत जहाँ, मिमि चक्रवर्ती, ज्योतिमणी आणि डीएमकेच्या खासदार थामीझाची या दिसत आहेत. या सर्वांना शशी थरुर यांनी टॅग केले आहे. मात्र, हा फोटो शेअर करताना दिलेल्या कॅप्शनमुळे चर्चांना उधाण आले आहे.
कोण म्हणतं की लोकसभा कामासाठी आकर्षक जागा नाही
शशी थरुर यांनी हा महिला खासदारांसोबतचा सेल्फी शेअर करताना, “कोण म्हणतं की लोकसभा ही कामासाठी आकर्षक जागा नाही?, माझ्यासोबतच्या सहा महिला सहकारी खासदारांसोबत काढलेला हा फोटो”, अशी कॅप्शन दिली आहे. यावरून नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडलेले दिसून आले. काहींनी या फोटोवर, महिला या काही केवळ सौंदर्यासाठी ओळखल्या जात नाही, असा टोला थरुर यांना लगावला आहे. लोक सभेचा कामकाज अधिक आकर्षक होण्यासाठी महिला तिथे नाहीत. त्या सभागृहाच्या सदस्य आहेत. तुम्ही त्यांचा अपमान करतायत, अशी टीकाही एका नेटकऱ्याने केली आहे.
दरम्यान, राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी १२ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनात घातलेल्या गोंधळामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे निलंबित खासदारांना अधिवेशनात सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीआय, सीपीएम आणि शिवसेनेच्या खासदारांचा समावेश आहे.