शशी थरूरना काँग्रेसच्या प्रवक्तापदावरून हटवले
By admin | Published: October 13, 2014 02:34 PM2014-10-13T14:34:49+5:302014-10-13T14:57:16+5:30
नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाचे कौतुक करणे काँग्रेस नेते शशी थरूर यांना महागात पडले असून काँग्रेसच्या प्रवक्तापदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाचे कौतुक करणे काँग्रेस नेते शशी थरूर यांना महागात पडले असून काँग्रेसच्या प्रवक्तापदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदींचे केलेले कौतुक आणि थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू यामुळे थरूर अडचणीत सापडले होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियानात ९ जणांना सहभागी करत त्यात शशी थरूर यांनाही स्थान दिले होते. थरूर यांनी ते निमंत्रण स्वीकारत मोदींनी आपली निवड करणं हा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र या घटनेवर केरळ काँग्रेसने नाराजी दर्शवली होती. थरूर यांची मोदींवरील वक्तव्ये काँग्रेसच्या विचारसरणीच्या विरोधात असल्याचे पक्षाचे केरळमधील उपाध्यक्ष सूरनाद राजशेकरन यांनी सांगितले होते. मोदींची स्तुती बंद करा अशी तंबीही त्यांना देण्यात आली होती. मात्र आपण हिंदुत्वाच्या अजेंडाच्या बाजूचे नसल्याचे सांगत मोदींबाबतची माझी वक्तव्ये राजकीय नव्हे तर व्यक्तिगत टिपण्णी आहेत, असे स्पष्टीकरण थरूर यांनी दिले होते.
तर जानेवारी महिन्यात थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह दिल्लीतील एका हॉटेलमध्ये सापडला होता. त्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे नुकतेच समोर आले. या सर्व प्रकारांमुळे थरूर अडचणीत सापडले होते.