शशिकला यांनी मुख्यमंत्री व्हावे
By admin | Published: January 3, 2017 04:07 AM2017-01-03T04:07:37+5:302017-01-03T04:07:37+5:30
उत्तर प्रदेशातील सत्तारूढ पक्षातील यादवीचा दाखला देत लोकसभेचे उपाध्यक्ष आणि अद्रमुक नेते एम. थम्बीदुराई यांनी अद्रमुकच्या नवनियुक्त सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांना
चेन्नई : उत्तर प्रदेशातील सत्तारूढ पक्षातील यादवीचा दाखला देत लोकसभेचे उपाध्यक्ष आणि अद्रमुक नेते एम. थम्बीदुराई यांनी अद्रमुकच्या नवनियुक्त सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होण्याची गळ घातली आहे.
उत्तर प्रदेशातील सत्तारूढ समाजवादी पार्टीत निर्माण झालेला पेच बघा. पक्ष वडिलांच्या बाजूने, तर पुत्राच्या बाजूने सरकार, अशी उभी फू ट पडली आहे. तेव्हा पक्ष आणि सरकारची धुरा एकाच व्यक्तीकडे असली पाहिजे, असे थम्बीदुराई यांचे म्हणणे आहे. शशिकला यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांनाही सामोरे गेले.
शशिकला यांनी मुख्यमंत्री होणे स्वाभाविक आणि रास्त आहे. चिनम्मा यांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याचे आवाहन केले, असे थम्बीदुराई यांनी पत्रकारांना सांगितले. शशिकला यांची काय प्रतिक्रिया होती, असे विचारले असता थम्बीदुराई म्हणाले, मी माझ्या वतीने आणि पक्ष कार्यकर्ता म्हणून त्यांना मुख्यमंत्री होण्याचा आग्रह केला. त्यांनी या प्रस्तावावर लागलीच कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
अद्रमुकच्या सर्वसाधारण परिषदेने २९ डिसेंबर रोजी अद्रमुकच्या सरचिटणीसपदी शशिकला यांची नियुक्ती केल्यानंतर शशिकला यांनी जयललिता यांचा वारसा पुढे चालविण्याचा निर्धार व्यक्त केला होता. ओ. पन्नीरसेल्वम यांच्या मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनीही शशिकला यांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेण्याचे आवाहन केलेले आहे.