शशिकला यांना पाच दिवसांचा पॅरोल मंजूर, आजारी पतीला भेटण्यासाठी मिळाला पॅरोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 01:17 PM2017-10-06T13:17:56+5:302017-10-06T13:46:14+5:30
भ्रष्टाचाराच्या खटल्यात कारावासाची शिक्षा झाल्याने सध्या तुरुंगात असलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही. के. शशिकला यांना पॅरोल मंजूर झाला आहे.
बंगळुरू - भ्रष्टाचाराच्या खटल्यात कारावासाची शिक्षा झाल्याने सध्या तुरुंगात असलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही. के. शशिकला यांना पॅरोल मंजूर झाला आहे. आजारी पतीला भेटण्यासाठी शशिकला यांना पाच दिवसांचा आपातकालीन पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांच्यावर नुकतीच अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती.
आजारी पतीला भेटण्यासाठी शशिकला यांनी गुरुवारी पॅरोल मंजुरीसाठी अर्ज केला होता. तसेच त्यासोबत आपल्या आजारी पतीची सर्व वैद्यकिय प्रमाणपत्रे जोडली होती. त्याआधीही 3 ऑक्टोबर रोजी शशिकला यांनी पॅरोलसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र तो अर्ज अपुऱ्या कागदपत्रांचा हवाला देत फेटाळून लावण्यात आला होता. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांच्यावर मंगळवारी मुत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपनाची जटील शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया सुमारे साडेसात तास चालली होती.
#FLASH: Sasikala granted parole for 5 days to visit her ailing husband. More details awaited. pic.twitter.com/uFJKx13eJu
— ANI (@ANI) October 6, 2017
बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी विशेष न्यायालयाने सुनावलेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने शशिकला यांना तुरुंगात जावे लागले होते. यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून त्या कारावास भोगत आहेत. शशिकला यांच्याबरोबरच त्यांचे नातेवाईक इलावरसी आणि व्ही.एन. सुधाकरन यांना सुद्धा चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तुरुंगात असलेल्या एआयएडीएमकेच्या सरचिटणीस शशिकला यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप याआधी झाला होता. . शशिकला यांचे तुरूंगातील सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर शशिकला यांना तुरूंगात व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचे बोलले जात होते. शशिकला यांना तुरुंगातील नियम लागू नसल्याचाही आरोप झाला होता. काही महिन्यांपूर्वी समोर आलेल्या बंगळुरुच्या मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही चित्रिकरणात साध्या वेषातील शशिकला तुरूंगाबाहेरून आतमध्ये येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी तुरुं गाच्या प्रवेशद्वारावर अनेक सुरक्षारक्षक तैनात होते. मात्र, तरीही शशिकला आरामात तुरूंगाच्या आतमध्ये प्रवेश करताना दिसत होत्या.