शशिकला यांना टीव्हीवर पाहावा लागला पलाणीसामींचा शपथविधी
By admin | Published: February 17, 2017 12:08 PM2017-02-17T12:08:58+5:302017-02-17T12:09:44+5:30
शशिकला यांनी राजभवनात पार पडलेला पलाणीस्वामींचा शपथविधी सेंट्रल जेलमध्ये टीव्हीसमोर बसून पाहिला
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 17 - तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर पक्षाची सुत्रे हाती घेण्याचं स्वप्न उराशी बाळगून वाटचाल सुरु केलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांचा प्रवास सध्या कारागृहात जाऊन थांबला आहे. मुख्यमंत्री म्हणून आपला शपथविधी पार पडावा यासाठी रान उठवणा-या शशिकला यांना मात्र पलाणीस्वामी यांचा शपथविधी पाहावा लागला. तो शपथविधीदेखील याची देही याची डोळा पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं नाही. कारागृहात टीव्हीवर हा शपथविधी त्यांना पाहावा लागला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शशिकला यांनी राजभवनात पार पडलेला शपथविधी सेंट्रल जेलमध्ये टीव्हीसमोर बसून पाहिला.
'शशिकला यांनी इतर कैद्यांसोबत कारागृहातील महिलांच्या बराकमध्ये पलाणीस्वामी आणि इतर 30 नेत्यांचा शपथविधी पाहिला', अशी माहिती कारागृह अधिका-याने दिली आहे. शशीकला यांचे निष्ठावंत ई. के. पलाणीस्वामी यांना अखेर राज्यपाल विद्यासागर राव यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. ते करतानाच त्यांना १५ दिवसांत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास राज्यपालांनी सांगितले. मात्र, ते १८ फेब्रुवारी रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करून दाखवणार आहेत.
पलाणीस्वामी यांनी राज्यपाल राव यांच्याकडे आपणास १२४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करीत, त्यांची यादी बुधवारी रात्री सादर केली होती. त्यानंतर, पनीरसेल्वमही राज्यपालांना भेटले. मात्र, त्या वेळी त्यांना १0 आमदारांचाच पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राव यांनी त्यांना पलाणीस्वामी यांना सरकार स्थापन करण्यास गुरुवारी निमंत्रित केले. विधानसभेचे सदस्य २३४ आहेत.
पलाणीस्वामी यांचे मंत्रिमंडळ ३१ जणांचे आहे. गेल्या नऊ महिन्यांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे पलाणीस्वामी हे अण्णा द्रमुकचे तिसरे नेते आहेत. जयललिता यांनी मे २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश प्राप्त केले. त्या ७४ दिवस रुग्णालयात असेपर्यंत मुख्यमंत्री होत्या. त्यांचे ५ डिसेंबर रोजी जयललिता यांचे निधन झाले आणि पनीरसेल्वम मुख्यमंत्रीपद झाले. जयललिता भ्रष्टाचाराच्या खटल्यात तुरुंगात गेल्या तेव्हाही त्यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले होते.
कार्यभार सांभाळण्याआधी पलाणीस्वामी शपथविधी पार पडलेल्या इतर मंत्र्यांसोबत कारागृहात जाऊन शशिकलांची भेट घेण्याची शक्यता आहे.