शशिकलांची माघार, धोरणात्मक चाल; अण्णाद्रमुकमध्ये प्रबळतेची खेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 05:43 AM2021-03-11T05:43:00+5:302021-03-11T05:43:30+5:30
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मिळणाऱ्या यशावर पुढील पावले टाकणार
असिफ कुरणे
चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणातून माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या जवळच्या सहकारी व्ही. शशिकला यांनी निवृत्तीची घोषणा करून अनेकांना धक्का दिला. सत्ताधारी अण्णाद्रमुक आघाडीसाठी ही दिलासा देणारी बाब असली तरी शशिकला यांचा हा निर्णय एक धोरणात्मक चाल असल्याचे अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे. जयललिता यांच्या पश्चात होणाऱ्या या दुसऱ्या निवडणुकीत मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत त्यांना किती यश मिळते, यावर शशिकला यांची पुढील चाल अवलंबून असणार आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षांच्या शिक्षेनंतर शशिकला यांचे ज्याप्रकारे तामिळनाडूमध्ये स्वागत झाले त्यानुसार विधानसभा निवडणुकीत त्या महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, गेल्या बुधवारी त्यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत आपली माघार जाहीर केली. पण त्याचवेळी त्यांनी आपला मुख्य विरोधी द्रमुकला पराभूत करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या भूमिकेने अण्णाद्रमुकला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण शशिकला पुतण्या टीटीव्ही दिनकरन यांच्या एएमएमके पक्षाचा प्रचार करतील, असा कयास होता. दिनकरन यांच्या एएमएमकेने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत जवळपास २२ लाख मते मिळवत (४ टक्के) आपले महत्त्व दाखवून दिले आहे. दिनकरन विधानसभेच्या माध्यमातून यात आणखी भर घालू इच्छितात. अण्णाद्रमुक पक्षात शशिकला यांना मानणारा मोठा गट आजही कार्यरत असून, तो त्यांच्यासोबत जाण्याचा धोका होता. पण त्यांनी आता घेतलेल्या माघारीमुळे एएमएमके सत्ताधारी आघाडीत सामील होण्याची चिन्हे आहेत. शशिकला यांनी माघार घेत एकाचवेळी दोन-तीन लक्ष्य समोर ठेवल्याचे चित्र दिसते. निवडणुकीत थेट सहभागी होत नसल्यामुळे केंद्र, राज्य सरकारच्या तपास यंत्रणाचा इतर प्रकरणातील ससेमिरा थांबेल.
निकालानंतर अण्णाद्रमुकमधील पलानीस्वामी, पनीरसेल्वम यांची ताकद कळेल. तसेच अण्णाद्रमुक समर्थकांमध्ये जयललिता यांच्यानंतर योग्य नेतृत्व म्हणून शशिकला यांचे नाव पुढे येईल, असा अंदाज आहे. पनीरसेल्वम, पलानस्वामी हे सत्तेतून बाहेर जाणे हेच शशिकला यांच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. तसेच एवढ्या घाईगडबडीत मोठी निवडणूक लढवून धोका पत्करण्यापेक्षा योग्य संधीची वाट पाहण्याचा मार्ग शशिकला यांनी निवडला आहे. त्यांनी राजकारणातून नाही तर विधानसभा निवडणुकीतून तात्पुरती माघार घेतली आहे. निवडणूक निकालानंतर त्या आपली चाल पुन्हा खेळतील आणि अण्णाद्रमुक पक्षात पूर्वीसारखे स्थान निर्माण करतील, असा अनेक जाणकारांचा अंदाज आहे.
पराभवाचे खापर फुटण्याचा धोका
शशिकला यांनी आता अण्णाद्रमुक आघाडीसोबत सक्रिय सहभाग दाखवला असता तर यशा-अपयशाच्या मानकरी त्याच ठरल्या असत्या. लोकसभेचा निकाल आणि तामिळनाडूमधील सध्याचे वातावरण पाहता अण्णाद्रमुक आघाडी पुन्हा सत्तेत येईल, याची शक्यता कमी दिसते. निवडणूक चाचण्यांनीदेखील द्रमुकच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे पराभवाचे खापर आपल्यावर फुटू नये, याची काळजी शशिकला यांनी घेतली आहे.