शशिकला समर्थकांना मारहाण
By admin | Published: December 29, 2016 12:41 AM2016-12-29T00:41:51+5:302016-12-29T00:41:51+5:30
अण्णा द्रमुकच्या मुख्यालयात सरचिटणीसपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास गेलेल्या खासदार शशिकला पुष्पा गेल्या असता, अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे
चेन्नई : अण्णा द्रमुकच्या मुख्यालयात सरचिटणीसपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास गेलेल्या खासदार शशिकला पुष्पा गेल्या असता, अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पती, वकील तसेच समर्थकांना बेदम मारहाण केली. अण्णा द्रमुकच्या जनरल कौन्सिलची बैठक उद्या, गुरुवारी होणार असून, त्यात नव्या सरचिटणीसांची निवड होणार आहे.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूनंतर अण्णा द्रमुकमध्ये जोरदार गटबाजी सुरू झाली असून, खा. शशिकला पुष्पा यांच्या समर्थकांना मारहाण हा त्याचाच भाग आहे. खा. शशिकला पुष्पा यांना पक्षातून निलबित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना पक्षातील कोणत्याही पदासाठी अर्ज करण्याचा अधिकार नाही, असे मुख्यालयात जमलेल्या अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. याउलट आपण आजही पक्षाच्या जनरल कौन्सिलच्या सदस्य आहोत. त्यामुळे आपल्याला सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत उभे राहण्याचा हक्क आहे, असे खा. जयललिता यांनी सांगितले.
अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी खा. जयललिता पुष्पा यांचे पती, वकील व समर्थकांना इतकी मारहाण केली, त्यांच्यापैकी काही जण रक्तबंबाळच झाले. पोलिसांनी दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांना एकमेकांपासून दूर करण्याचा केलेला प्रयत्नही यशस्वी झाला नाही.
खा. शशिकला पुष्पा यांनी राज्यसभेत काही महिन्यांपूर्वी पक्ष नेतृत्वाच्या विरोधात आवाज उठवला होता. आपल्या जीवाला पक्षाच्या नेत्यांपासून धोका असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्या भरात त्यांनी खासदारकीचा राजीनामाही देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर श्रीमती जयललिता यांनी त्यांना पक्षातून निलंबित केले होते.
आपण आजही जनरल कौन्सिलच्या सदस्य आहोत, असे शशिकला पुष्पा यांचे म्हणणे आहे. जनरल कौन्सिलच्या बैठकीत
शशिकला नटराजन यांची सरचिटणीसपदी निवड होणार, हे नक्की आहे. अशातच दुसऱ्या शशिकला यांनी अर्ज भरण्याचा प्रयत्न करणे, हे अण्णा द्रमुकमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे लक्षण मानले जात आहे. (वृत्तसंस्था)
शशिकला विरुद्ध शशिकला
जनरल कौन्सिलच्या बैठकीलाही खा. शशीकला पुष्पा येण्याचा प्रयत्न करतील, अशी चिन्हे आहेत. पण बहुसंख्य नेते व कार्यकर्ते यांनी शशीकला नटराजन यांनाच सरचिटणीस करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये सध्या शशीकला विरुद्ध शशीकला असेच चित्र निर्माण झाले आहे.