शशिकला नकोच होत्या, जयललितांचा व्हिडीओ मंत्र्याने केला जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 04:07 AM2017-09-02T04:07:14+5:302017-09-02T04:07:37+5:30
तामिळनाडूच्या सत्ताधारी अण्णा द्रमुकमधील अंतर्गत भांडणे मिटता मिटण्याची शक्यता दिसत नसून, मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी मंत्रिमंडळातील महसूलमंत्री आर.बी. उदयकुमार यांनी दोन व्हिडीओ जारी केले असून
चेन्नई : तामिळनाडूच्या सत्ताधारी अण्णा द्रमुकमधील अंतर्गत भांडणे मिटता मिटण्याची शक्यता दिसत नसून, मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी मंत्रिमंडळातील महसूलमंत्री आर.बी. उदयकुमार यांनी दोन व्हिडीओ जारी केले असून, त्यात राज्याच्या माजी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता या शशिकला कुटुंबावर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत.
अम्मांचा आत्मा अशा कृत्यांना माफ करील का? ही कृत्ये म्हणजे अम्मांचा विश्वासघात नाही का, असेही उदयकुमार यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, जयललितांच्या मृत्यूनंतर शशिकलांना पक्ष सरचिटणीस करण्याची मागणी उदयकुमार यांनीच सर्वप्रथम केली होती. त्यानंतर, काही काळाने ते पलानीस्वामी यांच्या समर्थनासाठी उभे राहिले.
डिसेंबर २०११ मधील हा व्हिडीओ असल्याचे सांगताना, उदयकुमार म्हणाले की, ज्यांना जयललितांनी पक्षाबाहेर हाकलले होते, तेच आता जयललितांच्या मृत्यूनंतर कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकत आहेत. दिनकरन यांनी पक्षात नव्याने नियुक्त्या करण्याचा, तसेच हकालपट्टी करण्याचा धडाका लावला
आहे, त्यावरही उदयकुमार यांनी टीका केली.
या व्हिडीओमध्ये जयललिता म्हणतात, ज्यांनी विश्वासघात केला, त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. एवढे होऊनही ते पक्षातील नेते, कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवतात व सांगतात की, ते एक ना एक दिवस पक्षात परततील. त्यानंतर, त्यांचा मोठा प्रभाव असेल. एवढेच नाही, तर जे नेते-कार्यकर्ते त्यांचे ऐकतील व त्याप्रमाणे वागतील, त्यांनाही माफी नाही.