शशिकला गुपचूप बाहेरही गेल्या होत्या? सीसीटीव्हीमधून झाले स्पष्ट, चौकशी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:15 AM2017-08-22T01:15:20+5:302017-08-22T08:44:38+5:30
अण्णा द्रमुकच्या आतापर्यंत तरी सरचिटणीस असलेल्या शशिकला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बंगळुरूच्या तुरुंगात असल्या तरी त्या बाहेरून तुरुंगात शिरत आहेत, असे सीसीटीव्ही फुटेज तपासात सापडले आहे.
बंगळुरू : अण्णा द्रमुकच्या आतापर्यंत तरी सरचिटणीस असलेल्या शशिकला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बंगळुरूच्या तुरुंगात असल्या तरी त्या बाहेरून तुरुंगात शिरत आहेत, असे सीसीटीव्ही फुटेज तपासात सापडले आहे. तुरुंगात असलेल्या शशिकला तुरुंगातून कोणाच्या आशीर्वादामुळे बाहेर पडल्या, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
शशिकला यांना तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, अशी तक्रार तुरुंगातील वरिष्ठ अधिकारी डी. रूपा यांनी मध्यंतरी केली होती. त्या वेळी त्यांनी आपल्या वरिष्ठांची नावे घेतली होती आणि त्यापैकी अधिकाºयांनी त्यासाठी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही डी. रूपा यांनी केला होता. त्यानंतर डी. रूपा व त्यांचे वरिष्ठ यांची बदली करून, कर्नाटक सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या चौकशीमध्येच शशिकला या साध्या वेशात बाहेरून तुरुंगात शिरत आहेत, असे सीसीटीव्ही फुटेज सापडले.
त्यामुळे त्यांना बाहेर जाण्याची परवानगी कशी मिळाली, ती कोणी दिली, त्या बाहेर का व कुठे गेल्या होत्या, या साºया बाबींची चौकशीही सुरू झाली आहे. तुरुंगातील वरिष्ठांच्या कृपादृष्टीशिवाय कैद्याला बाहेर पडणे शक्यच नाही. तसेच शशिकला यांच्याबाबतीत घडले असावे. मात्र त्यासाठी आर्थिक व्यवहार झाला असावा, असे दिसते. त्या बाहेरून तुरुंगात शिरत असताना, प्रवेशद्वारापाशी अनेक सुरक्षारक्षकही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. शशिकला अगदी सहजपणे आत शिरताना दिसत आहेत. (वृत्तसंस्था)
आरोप खरेच
त्यांना तुरुंगातही सर्व सुविधा मिळत असल्याचा आरोप डी. रूपा यांनी केला होता. त्यात त्यांनी महासंचालक सत्यनारायण राव यांचे नावच घेतले होते. शिवाय या प्रकरणात दोन कोटी रुपये संबंधितांना देण्यात आल्याचे डी. रूपा यांनी म्हटले होते. ते सारे खरे असल्याचे आता चौकशीतून जाणवू लागले आहे. याच तुरुंगात स्टॅम्प घोटाळ्यातील अब्दुल करीम तेलगी यालाही खास वागणूक मिळते आणि एका तपासणीत तेथील १८ कैद्यांनी अमली पदार्थ घेतल्याचे सिद्ध झाले होते, असेही डी. रूपा यांनी महासंचालक व तुरुंग महानिरीक्षक यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.