'देशात हुकूमशाही सरकार, 2024 मध्ये ममता बॅनर्जी गेम चेंजर ठरतील'- शत्रुघ्न सिन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 02:00 PM2022-07-21T14:00:45+5:302022-07-21T14:00:52+5:30
कोलकाता येथे टीएमसीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि मोदी सरकारवर हल्ला चढवला.
कोलकाता: पश्चिम बंगालच्या आसनसोलचे नवनिर्वाचित खासदार आणि बॉलीवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (shatrughan sinha) यांनी कोलकाता येथे झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या बैठकीत (Kolkata TMC Meeting) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे देशातील सर्वात लोकप्रिय नेत्या असल्याचे वर्णन केले आहे. तसेच, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी गेम चेंजर ठरतील असेही ते म्हणाले.
ते म्हणाले की, 'ममता बॅनर्जी या देशातील सर्वात विश्वासार्ह नेत्या आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीचे सरकार चालत होते, मात्र आता पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) नेतृत्वाखाली हुकूमशाहीचे सरकार सुरू आहे. मी देशातील सर्वात लोकप्रिय नेत्या, बंगालच्या वाघिणी आणि लोह महिला ममता बॅनर्जी आणि त्यांच्या नेतृत्वाला सलाम करतो,' असे सिन्हा म्हणाले. यासोबतच त्यांनी ममता बॅनर्जी यांना देशातील विरोधी पक्षाचा प्रमुख चेहरा असल्याचे म्हटले.
अग्निवीर आणि अग्रिपथच्या नावावर घोटाळा
शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले की, 'ममता बॅनर्जी जगात एक रोल मॉडेल म्हणून समोर आल्या आहेत. ममताजींनी युवाशक्ती आणि मनुष्यबळाच्या जोरावर यशाची पताका फडकवली आहे. त्या देशातील सर्वात लोकप्रिय नेत्या आहेत. ममताजींपेक्षा लोकप्रिय नेता कोणी नाही. आज ज्या प्रकारे जीएसटी घोटाळा, नोटाबंदीचा घोटाळा झाला. त्याचप्रमाणे आता अग्निवीर आणि अग्निपथच्या बाबतीत घोटाळा होत आहे. देशात लोकशाही नव्हे तर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली हुकूमशाही सुरू आहे,' असेही ते म्हणाले.