शत्रुघ्न सिन्हांनी केले काँग्रेस नेत्यांचे कौतुक; राहुल, चिदम्बरम, सुरजेवाला यांचीही स्तुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:17 PM2018-03-20T23:17:34+5:302018-03-20T23:17:34+5:30
शत्रुघ्न सिन्हा हे भाजपचे खासदार असले तरी त्यांनी केलेल्या ताज्या टिट्वमुळे ते मुरलेले काँग्रेसजन आहेत, असेच वाटू लागले आहे. सिन्हा यांनी टिट्वमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे राहुल गांधी यांचा उदय हा भव्य असून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला कोणत्याही परिस्थितीला हाताळू शकणारे तर आनंद शर्मा हे मित्र आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे बुद्धीमान आहेत अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले आहे.
नवी दिल्ली : शत्रुघ्न सिन्हा हे भाजपचे खासदार असले तरी त्यांनी केलेल्या ताज्या टिट्वमुळे ते मुरलेले काँग्रेसजन आहेत, असेच वाटू लागले आहे. सिन्हा यांनी टिट्वमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे राहुल गांधी यांचा उदय हा भव्य असून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला कोणत्याही परिस्थितीला हाताळू शकणारे तर आनंद शर्मा हे मित्र आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे बुद्धीमान आहेत अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले आहे.
नवज्योत सिंग सिद्धू हे आश्चर्यकारक असे लोकनेते आहेत, असे सिन्हा म्हणाले. राहुल गांधी यांनी दिल्लीत रविवारी काँग्रेसच्या झालेल्या खुल्या अधिवेशनात केलेले भाषण हे ‘जबरदस्त’ होते, असे सिन्हा यांनी म्हटले आहे. गांधी यांनी त्या भाषणात भाजपचे वर्णन सत्तेसाठी भुकेला रावण असे केले होते. गरीब, कंगाल शेतकऱ्यांच्या नशिबी नरेंद्र मोदी यांच्या भ्रामक अशा अच्छे दिन आणि स्वच्छ भारताच्या ‘मायावी’ जगात राहण्याची वेळ आली आहे, असे गांधी म्हणाले होते. रविवारीही सिन्हा यांनी काँग्रेसच्या खुल्या अधिवेशनानंतर दिल्लीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी शक्तिचे प्रभावी दर्शन घडवले असून ते भारतासाठी चांगले आहे, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या होत्या.
गोरखपूर व फुलपूरमध्ये भाजपचा पराभव झाला. सिन्हा यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना लोकमताचा अदमास घेण्यात अपयश आल्याबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांची याआधीच थट्टा केली होती.
मोदींवर मात्र टीकाच
राहुल गांधी यांच्या उदयाचे श्रेय शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व इतर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना दिले. पाटण्याचे असणारे खासदार शत्रुघ्न सिन्हा हे पक्षात या ना त्या निमित्ताने नाराजी व पक्षविरोधी भावना बोलून दाखवत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्य कारभाराच्या व निर्णय घेण्याच्या पद्धतीवर वारंवार हल्ले केले आहेत.