गुजरात विधानसभा निवडणूक भाजपासाठी आव्हान, शत्रुघ्न सिन्हांचा पंतप्रधान मोदी, अरुण जेटली व स्मृती इराणींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 11:22 AM2017-11-02T11:22:20+5:302017-11-02T11:23:55+5:30
भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी बुधवारी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली - भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी बुधवारी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधला आहे. जीएसटी आणि नोटाबंदी निर्णयासंदर्भात जनतेमध्ये राग आहे आणि गुजरात विधानसभा निवडणूक भाजपासाठी निवडणूक नाही तर एक आव्हान आहे, ही बाब स्पष्ट आहे, असे म्हणत सिन्हा यांनी भाजपाला पुन्हा टार्गेट केले आहे. एका आयोजित चर्चासत्र कार्यक्रमात शत्रुघ्न सिन्हा बोलत होते. ''एक वकील आर्थिक बाबींबद्दल बोलू शकतो, एक टीव्ही अभिनेत्री मनुष्यबळ विकास मंत्री होऊ शकते, आणि एक चहावाला.... बनू शकतात. तर मग मी अर्थव्यवस्थेवर का बोलू शकत नाही?'',असा प्रश्न यावेळी सिन्हांनी उपस्थित केला. दरम्यान, यावेळी सिन्हा यांनी कुणाच्याही नावाचा उल्लेख केला नाबी. मात्र त्यांचा थेट निशाणा हा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, पूर्वीच्या मनुष्य बळविकास मंत्री व आताच्या माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर होता.
सिन्हा पुढे असेही म्हणाले की, आपण पक्षासमोर आव्हानं उभी करत नसून भाजपा आणि देशाच्या हितासाठी त्यांना आरसा दाखवण्याचे काम करत आहे. जीएसटी, नोटाबंदी, बेरोजगारीमुळे लोकांमधील राग पाहून मला हे नाही सांगू इच्छित की भाजपाला किती जागा मिळतील पण निश्चित स्वरुपात गुजरात विधानसभा निवडणूक भाजपासाठी एक आव्हान असणार आहे. मी केवळ एवढंच सांगेन की ही निवडणूक नाही तर भाजपासाठी एक आव्हान असणार आहे.
'आत्मनिरीक्षणाची गरज'
दरम्यान, दुस-या राजकीय पक्षात सहभागी होणार का? असा प्रश्न यावेळी सिन्हा यांना विचारला असता त्यांनी त्यांच्या 'खामोश' असे त्यांच्या खास पद्धतीत उत्तर दिलं. यापूर्वी मंगळवारीही शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळी मिलन कार्यक्रमादरम्यान, भाजपा पक्षामध्ये निरनिराळ्या विचारांची लोकं आहेत, असे विधान केले होते. पंतप्रधान मोदींच्या याच विधानाचा संदर्भ देत शत्रुघ्न सिन्हा म्हणालेत की, 'मी विन्रमपणे विचारु इच्छितो की कधी कुणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की पक्षामध्ये अशी स्थिती का आहे?. काही नेते निराळ्या विचारांचे का आहेत?. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे काही नेते निराळ्या विचारांचे का आहेत? हे जाणण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे', असा थेट सवाल सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींना केला होता. शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींवर हे टीकास्त्र सोडलं आहे. एवढंच नाही तर सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी यांना आत्मनिरीक्षण करण्याचाही सल्ला दिला होता. याबाबत बोलताना सिन्हा यांनी ट्विटमध्ये असे म्हटलं होतं की, 'आत्मनिरीक्षणाची गरज आहे. जी लोकं सत्तेत आहेत त्यांच्याकडून त्या 'काही लोकां'साठी आतापर्यंत कोणत्या प्रकारचे प्रयत्न करण्यात आले, की केवळ वापर करुन त्यांना सोडून देण्यात आलं.' अशी बोचरी टीकाही त्यांनी केली होती.