‘जेईई’ पास होऊनही तिने केली आत्महत्या
By Admin | Published: April 30, 2016 03:54 AM2016-04-30T03:54:20+5:302016-04-30T03:54:20+5:30
अभियंता बनण्याची इच्छा नसलेल्या गाझियाबादच्या १७ वर्षीय कीर्ती तिवारी हिने आत्महत्येचे आततायी पाऊल उचलले.
जयपूर : जेईई (मुख्य) परीक्षा उत्तीर्ण होऊनही अभियंता बनण्याची इच्छा नसलेल्या गाझियाबादच्या १७ वर्षीय कीर्ती तिवारी हिने आत्महत्येचे आततायी पाऊल उचलले. गुरुवारी निकाल जाहीर होताच तिने राजस्थानमधील कोटा येथे वास्तव्याला असलेल्या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपविले.
निकालाबद्दल समाधानी नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे तिने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. कोटा हे एज्युकेशनल हब मानले जाते. यावर्षी तेथे कोचिंग क्लासमधील विद्यार्थ्यांनी ताण सहन न झाल्यामुळे आयुष्य संपविण्याची ही पाचवी घटना आहे. आयआयटीसाठी कट आॅफनुसार १०० गुणांची आवश्यकता असताना कीर्तीने १४४ गुण मिळविले होते. मिळविलेल्या गुणांबाबत ती समाधानी नव्हती. नैराश्य आणि अभियांत्रिकी अभ्यासात स्वारस्य नसणे हे तिच्या आत्महत्येचे प्रथमदर्शनी कारण मानले जात आहे.
व्हायचे होते खगोलशास्त्रज्ञ...
कीर्तीला खगोलशास्त्रज्ञ व्हायचे होते. आयआयटी प्रवेशासाठी तिने जेईईची परीक्षा दिली असली तरी मुळात तिला अभियंता व्हायचे नव्हते. एकीकडे आयआयटीसाठी प्रयत्न तर दुसरीकडे खगोलशास्त्रज्ञ होण्याची इच्छा बाळगणे हे आश्चर्यकारक आहे. तिने वडिलांची क्षमा मागितली असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
—————————————
मिळविले होते १४४ गुण...
आईच्या इच्छेनुसार तिने विज्ञान विषय निवडला मात्र तिला भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्रात रुची नव्हती, असे कोटाचे पोलीस अधीक्षक एस.एस. गोदारा यांनी तिच्या कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत सांगितले. ती दोन वर्षांपासून कोटा येथे शिक्षण घेत होती. तिच्यासोबत मातापित्यापैकी एक जण असायचे. तिचे वडील जीममध्ये गेले होते, तर आई गाझियाबादच्या निवासस्थानी होती. जवळ कुणी नसल्याचे पाहून तिने इमारतीवरून उडी घेण्याचे पाऊल उचलले. अभ्यासक्रमाचा न झेपावणारा ताण आणि कुटुंबियांचे अपेक्षांचे ओझे याच्या दबावाखाली मुले प्रवेश परीक्षेला सामोरे जात असल्याचे कोटा येथील या ताज्या घटनेवरून दिसून येते. बाहेरील विद्यार्थ्यांवर कोटा येथे कोचिंग क्लास आणि राहण्यासाठी होणारा खर्च आणि सामाजिक प्रतिष्ठा याचेही दडपण असते, असे प्रकर्षाने समोर येऊ लागले आहे.