Narendra Modi: ‘ती’ म्हणाली, वडिलांचा दृष्टिदोष दूर करण्यासाठी डॉक्टर होणार; मोदी भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 05:58 AM2022-05-13T05:58:34+5:302022-05-13T05:58:45+5:30
गुजरातच्या कार्यक्रमातील घटना. अंशत: अंधत्व आलेले अयुब पटेल हे कार्यक्रमात सहभागी झाले होते. तुम्ही तुमच्या मुलींना शिक्षण देता की नाही, असा प्रश्न मोदींनी विचारला होता.
अहमदाबाद : सरकारी योजनांचा लाभ मिळालेल्या गुजरातमधील लोकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यावेळी अंशत: अंधत्व आलेल्या व्यक्तीच्या मुलीचे बोलणे ऐकून मोदी भावुक झाले. आपल्या वडिलांना असलेली दृष्टीदोषासंबंधीची अडचण सोडविण्यासाठी मी डॉक्टर होणार आहे, असे त्या मुलीने पंतप्रधानांना सांगितले. तुझ्या मनातील करूणा हेच तुझे सामर्थ्य आहे, या शब्दांत मोदींनी त्या मुलीचे कौतुक केले.
अंशत: अंधत्व आलेले अयुब पटेल हे कार्यक्रमात सहभागी झाले होते. तुम्ही तुमच्या मुलींना शिक्षण देता की नाही, असा प्रश्न मोदींनी विचारताच अयुब म्हणाले की, मला तीन मुली असून, त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यासाठी त्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळाली. सर्वांत धाकटी मुलगी बारावीला असून तिला डाॅक्टर व्हायचे आहे.
तुष्टीकरणाचे राजकारण आले संपुष्टात : मोदी
सरकारी योजनांचा सर्व पात्र व्यक्तींना लाभ मिळत असल्याने तुष्टीकरणाचे राजकारण संपुष्टात आले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. विधवा, निराधार, वृद्ध नागरिकांना आर्थिक साह्य देण्यासाठी गुजरात सरकारने आखलेल्या चार योजनांचा लाभ पात्र गटातील १०० टक्के व्यक्तींपर्यंत पोहोचत असल्याबद्दल भरूच जिल्हा प्रशासनाने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी पंतप्रधान बोलत होते.