नर्स व्हायचे म्हणून तिने रोखला स्वत:चा बालविवाह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 06:48 AM2022-10-28T06:48:25+5:302022-10-28T06:48:49+5:30
पुरुलिया जिल्ह्यातील काशीपूर भागात राहाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्याचा तिच्या पालकांचा विचार होता. मात्र ही मुलगी स्थानिक स्तरावरील कन्याश्री या संघटनेची सदस्य होती.
पुरुलिया : नर्स बनण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या एका अल्पवयीन मुलीने मोठ्या धाडसाने स्वतः चाच बालविवाह रोखला. तिने प्रस्तावित विवाह विरोधात सरकारी यंत्रणेकडे दूरध्वनीवरून तक्रार केली व आपल्यावरील संकट दूर सारले. ही घटना पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात घडली आहे.
पुरुलिया जिल्ह्यातील काशीपूर भागात राहाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्याचा तिच्या पालकांचा विचार होता. मात्र ही मुलगी स्थानिक स्तरावरील कन्याश्री या संघटनेची सदस्य होती. १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुलींचा विवाह करता येत नाही. त्याआधी झालेला विवाह बेकायदेशीर ठरतो या गोष्टीची तिला पूर्ण कल्पना होती. दोबापारा येथील अंगणवाडीत शिक्षण घेत असताना आशा व युनिसेफच्या कार्यकर्त्यांकडून ही माहिती तिला मिळाली होती.
आपला बालविवाह करण्याच्या तयारीला आईवडील लागले आहेत हे कळल्यानंतर मुलगी अस्वस्थ झाली. तिने दूरध्वनीवर चाईल्ड लाईनशी संपर्क साधून आपल्या प्रस्तावित बालविवाह विरोधात तक्रार दाखल केली. काही सरकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ तिच्या घरी आईवडिलांशी चर्चा केली आणि त्यांची समजूत काढली. (वृत्तसंस्था)