बलात्कार करणाऱ्यासाेबत ‘तिला’ करायचे आहे लग्न; पीडितेची सर्वाेच्च न्यायालयात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 05:39 AM2021-08-01T05:39:31+5:302021-08-01T05:40:13+5:30
पीडितेने केरळ उच्च न्यायालयात याबाबत सर्वप्रथम याचिका दाखल केली हाेती; मात्र ती न्यायालयाने फेटाळली हाेती.
तिरुवनंतपुरम: बलात्कार करणाऱ्या माजी धर्मगुरुसाेबत विवाह करण्याच्या परवानगीसाठी एका पीडित महिलेने सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विवाह करण्यासाठी पीडितेने त्याच्या जामीनासाठीदेखील अर्ज केला आहे. या याचिकेवर साेमवारी सुनावणी हाेणार आहे.
पीडित महिला केरळची असून, चार वर्षांपूर्वी तिच्यावर अत्याचार करण्यात आला हाेता.
तिने एका बाळाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला हाेता. राॅबिन वडक्कूमचेरी असे तिच्यावर अत्याचार करणाऱ्याचे नाव असून, ताे ५३ वर्षांचा आहे. पीडितेने केरळ उच्च न्यायालयात याबाबत सर्वप्रथम याचिका दाखल केली हाेती; मात्र ती न्यायालयाने फेटाळली हाेती. त्यामुळे तिने सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २७ फेब्रुवारी २०१७ ला अटक केल्यानंतर वडक्कूमचेरीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालविण्यात आला. न्यायालयाने त्याला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठाेठावली हाेती.
प्रकरण काय?
हा प्रकार घडला त्यावेळी वडक्कूमचेरी हा ख्रिश्चन धर्मगुरू हाेता. पीडिता कन्नूर येथील चर्चतर्फे चालविण्यात येणाऱ्या शाळेत इयत्ता ११वी मध्ये शिकत हाेती. तिने ७ फेब्रुवारी २०१७ ला बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली.