प्रेम, सेक्स टेपमुळे गाजलेल्या शेहला मसूद हत्या प्रकरणात चौघांना जन्मठेप
By admin | Published: January 28, 2017 05:56 PM2017-01-28T17:56:37+5:302017-01-28T17:56:37+5:30
हत्येमध्ये भाजप आमदार आणि आरएसएसच्या काही नेत्यांची नावे आल्याने त्यावेळी या प्रकरणाची देशभरात बरीच चर्चा झाली होती.
Next
ऑनलाइन लोकमत
इंदूर, दि. 28- संपूर्ण देशभरात गाजलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्या शेहला मसूद हत्या प्रकरणात विशेष सीबीआय कोर्टाने मुख्य आरोपी झाहीदा परवेझसह चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पाचवा आरोपी इरफान माफीचा साक्षीदार बनल्याने न्यायालयाने त्याची मुक्तता केली.
हत्येमध्ये भाजप आमदार आणि आरएसएसच्या काही नेत्यांची नावे आल्याने त्यावेळी या प्रकरणाची देशभरात बरीच चर्चा झाली होती. झाहीदा परवेझ, साबा फारुकी, शाकीब आणि ताबीश या चौघांना न्यायालयाने जन्मठेप सुनावली. 16 ऑगस्ट 2011 रोजी भोपाळमध्ये राहणा-या शेहलाची तिच्या घराजवळ गोळया झाडून हत्या करण्यात आली.
पोलिसांनी सुरुवातीला आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढला. बरीच टीका झाल्यानंतर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात आले. लाखो फोन कॉल्स तपासल्यानंतर सीबीआयने मुख्य आरोपी झाहीदाला अटक केली आणि या संपूर्ण कटाचा उलगडा झाला.
सीबीआयने केलेल्या तपासातून झाहीदाचे तत्कालिन भाजपा आमदार ध्रुव नारायण सिंह बरोबर प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. शेहला आणि ध्रुव नारायण यांची वाढती जवळीक झाहीदाला खटकत होती. त्याचा रागातून तिने भाडोत्री मारेक-यांकरवी शेहलाची हत्या घडवून आणली. सीबीआयने झाहीदा आणि साबाला फेब्रुवारी 2012 मध्ये अटक केली. मार्च 2012 मध्ये शार्प शूटर इरफान आणि त्याच्या सहका-याला अटक झाली होती.