‘शी टीम्स’मुळे महिला अत्याचार झाले कमी
By admin | Published: October 27, 2016 02:34 AM2016-10-27T02:34:59+5:302016-10-27T02:34:59+5:30
हैदराबादमध्ये महिलांवरील अत्याचारात २० टक्क्यांची घट झाली आहे. हे शक्य झाले आहे अर्थातच ‘शी टीम्स’मुळे. येथील पोलिसांतील ‘माणसांनी’ राबविलेली मोहीम
हैदराबाद : हैदराबादमध्ये महिलांवरील अत्याचारात २० टक्क्यांची घट झाली आहे. हे शक्य झाले आहे अर्थातच ‘शी टीम्स’मुळे. येथील पोलिसांतील ‘माणसांनी’ राबविलेली मोहीम आज सर्वांसाठी आदर्श ठरू पाहत आहे. या टीमने शहरावर बारीक नजर ठेवल्यामुळेच हे शक्य झाले आहे.
‘शी टीम्स’ची स्थापना २४ आॅक्टोबर २०१४ मध्ये झाली. या टीममध्ये अधिकाधिक महिलांचाच समावेश आहे. जे लोक महिलांचा छळ करतात त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठीच या टीमची स्थापना करण्यात आली आहे. सप्टेंबरपर्यंत महिलांच्या छळ आणि अश्लील शेरेबाजीचे एकूण १,२९६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जे मागील वर्षाच्या सप्टेंबरपर्यंत १,५२१ होते. तर, २०१४ च्या सप्टेंबरपर्यंत असे १,६०६ गुन्हे दाखल होते. महिलांसाठी हैदराबाद शहर अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने या टीमची स्थापना करण्यात आली. हैदराबाद पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या टीमच्या स्थापनेपासूनच पोलिसांनी मोठी मेहनत केली आहे आणि महिलांसाठी हे शहर सुरक्षित करण्यासाठी सातत्याने हे प्रयत्न करीत राहू.
अपर पोलीस आयुक्त स्वाती लकडा यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात घट झाली आहे. महिलांच्या छेडछाडीचे प्रकारही कमी झाले आहेत. कारण, तरुणांमध्ये एक भीती निर्माण झाली आहे. लकडा यांनी सांगितले की, आतापर्यंत शी टीम्सने गस्त घालताना ८०० लोकांना पकडले. (वृत्तसंस्था)
अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये
शी टीम्सचे अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये असतात आणि ते
कॉलेज अथवा अन्य ठिकाणी निगराणी करतात. यात एक पुरुष आणि एक महिला उपनिरीक्षक असते. यांच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी गुप्त कॅमेरेही असतात.