शेख हसीना आज भारत सोडण्याची शक्यता; हे होऊ शकतात बांगलादेशचे नवे पंतप्रधान...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 07:57 AM2024-08-06T07:57:25+5:302024-08-06T07:59:23+5:30
बांगलादेशच्या हवाईदलाने C-130 विमानाने हसीना यांना भारतात आणून सोडले आहे. हसीना पॅकअप करत असल्याचे लाईव्ह व्हिडीओ पाहून आंदोलकांना आवरण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या सैन्याने देखील आनंदोत्सव साजरा केला आहे.
बांगलादेशातील शेख हसीना यांची १५ वर्षांची सत्ता एका आंदोलनाने उलथवून लावली आहे. हसीना यांना भारतात पळ काळावा लागला असून त्यांना हवाई दलाच्या हिंडन एअरबेसवर उतरावे लागले आहे. हसीना यांनी ५ ऑगस्टला पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि देश सोडला आहे.
बांगलादेशच्या हवाईदलाने C-130 विमानाने हसीना यांना भारतात आणून सोडले आहे. हसीना पॅकअप करत असल्याचे लाईव्ह व्हिडीओ पाहून आंदोलकांना आवरण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या सैन्याने देखील आनंदोत्सव साजरा केला आहे. हिंडन एअरबेसवर अजित डोवाल यांनी हसीना यांची भेट घेतली. आज त्या लंडन किंवा फिनलँडला जाण्याची शक्यता आहे. शेख हसीना यांच्या जागी नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद यूनुस अंतरिम पंतप्रधान बनू शकतात.
हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशाच्या सैन्य प्रमुखांनी आम्ही अंतरिम सरकार बनविणार आहोत. देशाला आता आम्ही सांभाळणार आहोत असे सांगितले. तसेच आंदोलनात ज्या लोकांची हत्या झाली त्यांना न्याय दिला जाईल, असेही म्हटले आहे.
बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते खालिदा जिया यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना २०१८ मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात १७ वर्षांची शिक्षा झाली होती. सत्ता उलथवून लावणारा हा भारताचा तिसरा शेजारी देश आहे. यापूर्वी पाकिस्तान, श्रीलंका या देशांमध्ये असेच भयंकर सत्तांतर झाले होते.
शेख हसीना सध्या भारतातच असून त्यांना अद्याप ब्रिटनकडून हिरवा झेंडा मिळालेला नाही. हसीना यांना ब्रिटनकडून राजनैतिक शरण हवी आहे. सध्या ब्रिटन देखील अवैध घुसखोरांमुळे जळत असून यामुळे त्यांच्याकडूनही काही स्पष्ट बोलले जात नाहीय. यामुळे सध्यातरी हसीना यांना भारतात राहण्याशिवाय पर्याय दिसत नाहीय.
हसीना यांच्यासोबत त्यांची बहीण रेहाना देखील आहे. तिच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व आहे. रेहाना यांची मुलगी ट्युलिप सिद्दीकी या ब्रिटनमध्ये लेबर पार्टीच्या खासदार आहेत. यामुळे हसीना यांना ब्रिटनमध्ये शरण मिळण्याची शक्यता अधिक आहे.