शेख हसीनांचे भारतातून अमेरिकेवर गंभीर आरोप; म्हणाल्या, लष्करी तळाला परवानगी दिली नाही म्हणून...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 09:59 AM2024-08-11T09:59:03+5:302024-08-11T09:59:19+5:30
Sheikh Hasina message to Bangladesh: बांगलादेशात जेव्हा आरक्षणविरोधी आंदोलन सुरु झाले, त्यापूर्वीच हसीना यांनी संसदेत अमेरिकेच्या कारस्थानाचा उल्लेख केला होता.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान यांनी सध्या भारतात आश्रय घेतला आहे. बांगलादेशात हिंसाचार सुरु आहे, यामुळे त्यांना सत्ता सोडून भारतात पळून यावे लागले आहे. यावर आता पाच दिवसांनी शेख हसीना यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने आपल्याला सत्तेतून हटवण्याचे कारस्थान रचले आहे, असा आरोप हसीना यांनी केला आहे.
अमेरिकेला आपण सेंट मार्चिन बेट दिले नाही, यामुळे त्यांनी हे कारस्थान रचले. हे बेट त्यांना दिले असते तर बंगालच्या खाडीत अमेरिकेचे वर्चस्व वाढले असते. बांगलादेशींनी कट्टरतावाद्यांच्या गोष्टींत येऊ नये, असेही आवाहन हसीना यांनी केले आहे. हसीना यांनी जवळच्या सहकाऱ्यांकरवी हा संदेश दिला आहे. हा संदेश इकॉनॉमिक टाईम्सला मिळाला आहे.
मला मृतदेहांची रॅली पहायची नव्हती. म्हणून मी राजीनामा दिला. अमेरिकेला जागा दिली असती तर मी सत्तेत आरामात राहिले असते. विद्यार्थ्यांच्या मृतदेहांवरून त्यांना सत्तेत यायचे होते. परंतू मी तसे होऊ दिले नाही व राजीनामा देऊन बाहेर पडले. जर मी देशात राहिले असते तर आणखी अनेक लोकांचा जीव गेला असता. अनेक संपत्तींचे नुकसान झाले असते. तुम्ही मला निवडले म्हणून मी बांगलादेशची नेता झाले. तुम्हीच माझी ताकद आहात. अवामी लीगच्या नेत्यांची हत्या झाली त्याचा निषेध करते. मी लवकरच देशात परतेन असे आश्वासन हसीना यांनी बांगलादेशी नागरिकांना दिले आहे.
मी विद्यार्थ्यांना कधीच रझाकार म्हटले नाही. माझे म्हणणे मोडून तोडून दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही एकदा माझे भाषण पूर्ण ऐका. षड्यंत्रकर्त्यांनी तुमच्या निर्दोषतेचा फायदा घेऊन देश अस्थिर करण्यासाठी तुमचा वापर केला आहे, असा आरोप हसीना यांनी केला आहे.
बांगलादेशात जेव्हा आरक्षणविरोधी आंदोलन सुरु झाले, त्यापूर्वीच हसीना यांनी संसदेत अमेरिकेच्या कारस्थानाचा उल्लेख केला होता. अमेरिका देशाच सत्तांतर करण्याची योजना बनवत आहे. बंगालच्या उपसागरात लष्करी तळ उभारण्याची परवानगी दिली तर त्यांच्या सरकारला कोणतीही अडचण येणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले होते, असा दावा हसीना यांनी केला होता. तेव्हा हसीना यांनी बंगालच्या उपसागराला युद्धभूमी बनू देणार नाही असे म्हटले होते.