Pulwama Attack: सामाजिक भान जपणाऱ्या जिल्हाधिकारी; स्वीकारणार शहिदाच्या कुटुंबाची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 05:06 PM2019-02-18T17:06:04+5:302019-02-18T17:07:25+5:30
शहीद जवानांच्या मदतीसाठी सरसावल्या जिल्हाधिकारी इनायत खान
शेखपुरा: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्यानं देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करा, अशी भावना संपूर्ण देशातून व्यक्त होत आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली जात आहे. एका बाजूला पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त होत असताना दुसऱ्या बाजूला हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. बिहारमधील एक जिल्हाधिकारी राज्यातील शहीद जवानाच्या कुटुंबीयांची जबाबदार स्वीकारणार आहेत.
बिहारच्या शेखपूरच्या जिल्हाधिकारी इनायत खान यांनी जिल्ह्यातील एका शहीद कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. राज्यातील दोन जवान गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. या दोन्ही कुटुंबांच्या मदतीसाठी बँक खाती उघडण्याचे आदेश इनायत खान यांनी दिले. या कुटुंबांच्या सहाय्यासाठी जमा झालेला निधी या खात्यांमध्ये जमा करण्यात येईल. 10 मार्चपर्यंत जितका मदत निधी जमा होईल, त्याचे दोन समान भाग करुन ते दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा केले जातील, अशी माहिती खान यांनी दिली. मी दोनपैकी एका कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पाटनाच्या रारगढ गावचे संजय कुमार सिन्हा आणि भागलपूरच्या रतनपूर गावचे रतन कुमार ठाकूर यांनी पुलवामातील हल्ल्यात हौतात्म्य पत्करलं.
गुरुवारी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. आदिल अहमद दार या दहशतवादी तरुणानं स्फोटकांनी भरलेल्या कारसह एका बसला धडक दिली. जैश-ए-मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी शहीद जवानांच्या कुटुंबांना मदत जाहीर केली. याशिवाय सर्वसामान्य जनताही शहिदांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढे सरसावली. क्रिकेटपटू, बॉलिवूड कलाकार यांच्यासह अनेक क्षेत्रांमधली व्यक्तींनीदेखील शहीदांच्या कुटुंबीयांना सढळ हातांनी मदत केली.