...ही वेडी आहे, हिच्या मागून चालतो भूतांचा तांडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 09:47 AM2024-01-28T09:47:59+5:302024-01-28T09:48:21+5:30
हिंदू धर्मात महिला किंवा मुलींनी स्मशानभूमीवर जाणे अशुभ मानले जाते. असे कृत्य कुणी केल्यास त्या व्यक्तीवर सर्व स्तरांमधून टीका केली जाते. परंतु, टीकेची पर्वा न करता फरीदाबादमध्ये राहणारी २६ वर्षांची पूजा यादव या तरुणीने आतापर्यंत ४ हजारांहून अधिक मृतदेहांना स्मशानभूमीत अग्नी दिला आहे.
फरीदाबाद - हिंदू धर्मात महिला किंवा मुलींनी स्मशानभूमीवर जाणे अशुभ मानले जाते. असे कृत्य कुणी केल्यास त्या व्यक्तीवर सर्व स्तरांमधून टीका केली जाते. परंतु, टीकेची पर्वा न करता फरीदाबादमध्ये राहणारी २६ वर्षांची पूजा यादव या तरुणीने आतापर्यंत ४ हजारांहून अधिक मृतदेहांना स्मशानभूमीत अग्नी दिला आहे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ती स्वत: अस्थींचे गंगेत विसर्जन करण्यासाठी प्रत्येक आमावास्येला हरिद्वारला जाते. ती स्वत: जाते कारण ते सर्व मृतदेह बेवारस असतात. कुणीही यांची जबाबदारी घेत नसते. पूजा मूळच्या दिल्लीत राहत होत्या. परंतु, सध्या त्यांनी आता मुक्काम फरीदाबादला हलविला आहे.
मार्च २०२२ मध्ये त्यांच्या सख्ख्या भावाला कुणीतरी गोळी मारली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. हे समजताच धक्क्याने वडील कोमात गेले होते. पूजाने आसपासच्या अनेकांना भावांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत करा म्हणून विनंती केली परंतु कुणीही पुढे आले नाही. त्यामुळे अखेर पूजाने स्वत: स्मशानभूमीत जाऊन भावावर अंत्यसंस्कार केले. त्यावेळी तिला बेवारस मृतदेहांची समस्या किती गंभीर असते, याची कल्पना आली वतिने अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था)
कोण पुरवतो पैसे?
- यासाठी येणारा खर्च पूजा स्वत: करते. पूजाचे आजोबा सैन्यात होते. ते शहीद झाल्यानंतर घरच्यांना पेन्शन मिळते.
- त्यातील काही पैसे आजी पूजाला अंत्यसंस्काराच्या कामासाठी देत असते. पूजाचे वडीलही दिल्ली मेट्रोमध्ये नोकरी करतात.
- तिचे वडीलही पूजाला या कामासाठी दर महिना १० ते १५ हजारांची मदत करतात. पूजा दररोज १२ ते १५ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करते. बेवारस मृतदेह आढळला की हॉस्पिटलमधून पूजाला फोन येतात.
हल्ल्यात पाय फ्रॅक्चर
सध्या मित्र परिवार पूजाला मदत करीत असतो. परंतु, सुरुवातीला स्थिती अशी नव्हती. लोकांनी तिला खूप टोमणे मारले. या मुलीला वेड लागले आहे, असाही प्रचार काही जणांनी सुरू केला होता. ही मुलगी चालते तेव्हा तिच्या मागून भूतांचा तांडा चालत असतो, असेही लोक एकमेकांना सांगत असत. काही लोकांना पूजाचे हे काम अजिबात रुचले नाही. त्यामुळे त्यांनी पूजावर हल्लाही केला होता. त्यात पूजाच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. या घटनेनंतरही पूजा खचली नाही. जोवर मी जिवंत आहे तोवर हे काम करीतच राहणार, असा पूजाचा निर्धार आहे.