Wasim Rizvi : इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारणार वसीम रिझवी, यती नरसिंहानंद करून घेणार सनातन धर्मात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 08:07 AM2021-12-06T08:07:33+5:302021-12-06T08:12:56+5:30
वसीम रिझवी हे अनेक वेळा कट्टरपंथी मुस्लिमांच्या निशाण्यावर असतात. त्यांनी कुराणातील 26 आयत काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती...
शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी (Wasim Rizvi) इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारणार आहेत. डासना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद गिरी महाराज हे त्यांचा सनातन धर्मात प्रवेश करवून घेतील. मिळालेल्या माहितीनुसार, रिझवी आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास गाझियाबादमधील डासना देवी मंदिरात हिंदू धर्मात प्रवेश करतील. संपूर्ण विधींसह अथवा रितीरिवाजासह त्यांचा हिंदू धर्मात प्रवेश करवून घेतला जाईल. (Shia waqf board former chairman wasim rizvi will accept hindu dharma)
काही दिवसांपूर्वीच जारी केले मृत्यूपत्र -
वसीम रिझवी यांनी काही दिवसांपूर्वीच मृत्यूपत्र जारी केले आहे. यात त्यांनी घोषणा केली आहे, की मृत्यूनंतर आपले दफन करण्यात येऊ नये, तर हिंदू परंपरेप्रमाणेच आपल्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत. एवढेच नाही, तर यती नरसिंहानंद यांनी आपल्या चितेवर अग्नीसंस्कार करावेत, असेही रिझवी यांनी म्हटले होते.
रिझवी यांनी नुकताच एक व्हिडिओ जारी करत म्हटले होते की, मला ठार मारण्याचा आणि शिरच्छेद करण्याचा कट रचला जात आहे. माझा गुन्हा एवढाच आहे की, मी कुराणातील 26 आयतना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मुस्लिमांची मला मारण्याची इच्छा आहे. तसेच, त्यांनी मला कुठल्याही कब्रस्तानात जागा देणार नाही, असेही जाहीर केले आहे. यामुळे मी मेल्यानंतर माझ्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे रिझवी यांनी म्हटले आहे.
कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर असतात रिझवी -
वसीम रिझवी हे अनेक वेळा कट्टरपंथी मुस्लिमांच्या निशाण्यावर असतात. त्यांनी कुराणातील 26 आयत काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली होती. तेव्हापासून रिझवी मुस्लीम संघटनांच्या निशाण्यावर आहेत. रिझवी यांचा इस्लाम आणि शिया समाजाशी काहीही संबंध नसल्याचेही मुस्लीम संघटनां म्हणतात. एवढेच नाही, तर रिझवी हे मुस्लीम विरोधी संघटनांचे एजंट आहेत, असेही मुस्लीम संघटना म्हणतात.