हृदयद्रावक! "लवकर घरी येईन, वाढदिवसासाठी केक आणेन"; 6 वर्षाचा लेक पाहतोय आईची वाट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 12:23 PM2024-02-05T12:23:31+5:302024-02-05T12:32:07+5:30
हाफ डे घेऊन घरी लवकर परत येईन आणि मुलाच्या वाढदिवसाचा केकही आणेन असं त्यांनी घरी सांगितलं होतं.
हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील बद्दी येथे एका परफ्युम फॅक्ट्रीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 31 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच चार जण अद्याप बेपत्ता असून, या घटनेला चार दिवस उलटून गेले असले तरी त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही. यामध्ये चंपो देवी यांचाही अद्याप शोध सापडलेला नाही. ज्या दिवशी आग लागली त्यादिवशी चंपो देवी यांच्या मुलाचा वाढदिवस होता.
हाफ डे घेऊन घरी लवकर परत येईन आणि मुलाच्या वाढदिवसाचा केकही आणेन असं त्यांनी घरी सांगितलं होतं. मात्र त्या अजूनही सापडलेल्या नाहीत. चंपो देवी य़ा बडोह गावच्या रहिवासी आहेत. तिचा नवराही एका फॅक्ट्रीत कामाला होता. चंपो देवी यांना दोन मुलं आहेत. घटनेच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी त्यांच्या सहा वर्षांच्या मुलाचा वाढदिवस होता.
महिलेने आपल्या मुलाला सांगितलं होतं की, ती त्या दिवशी 2 वाजता निघेल. महिलेचा पती दुसऱ्या फार्मा कंपनीत काम करतो. आगीच्या घटनेनंतर पतीने कंपनी आणि रुग्णालयांशी संपर्क साधला, मात्र चंपो देवी यांचा पत्ता लागला नाही. चंपो देवी यांते पती सर्वदयाल यांनी सांगितलं की, आतापर्यंत पत्नीबाबत काहीही सापडलेलं नाही.
पाचपैकी चार मृतदेहांची ओळख पटली आहे. मात्र एका मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. इतर चार मृतांपैकी तीन उत्तर प्रदेशातील आणि एक हरियाणातील पंचकुला येथील असून सर्व महिला आहेत. भीषण आगीच्या घटनेच्या चौथ्या दिवशी एनडीआरएफची टीम पुन्हा बचावकार्याला सुरुवात करणार आहे. मात्र, फॅक्ट्रीची इमारत असुरक्षित घोषित करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.