"शिंदे गट खरी शिवसेना नसून 'ज्युनिअर भाजपा'; १२ तारखेनंतर सरकार कोसळेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 03:11 PM2022-08-10T15:11:29+5:302022-08-10T15:11:55+5:30
दोन तृतीयांश बहुमत असले तरी शिवसेना मूळ पक्ष त्यांचा असू शकत नाही. घटनेच्या १० व्या सूचीनुसार दुसऱ्या गटाला विलीन व्हावेच लागेल असं खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली - सुशील मोदी ना घरचे ना घाटचे. ते शिवसेनेवर टीका करतात ते हास्यास्पद. भाजपा केवळ विरोधी पक्षांवर नाही तर सोबत असणाऱ्या पक्षांनाही संपवण्याचा घाट घालतं. सत्तेच्या नादात भाजपा मित्रपक्षांना संपवण्याचा प्रयत्न करतं. शिवसेनेला मराठी माणसाने बनवली आहे. कुणीही शिवसेना संपवू शकत नाही. जे टीका टिप्पणी करतात त्यांनी शिवसेना काय आहे ते समजून घ्यावं नाहीतर राज्यात त्यांचे हसू होईल अशा शब्दात खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे.
प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, शिवसेना एकच आहे. ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. भाजपासोबत जे आहेत ती ज्युनिअर भाजपा आहे. त्यांनी कितीही म्हटलं खरी शिवसेना आम्ही तरीही शिवसैनिक, शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचीच आहे. संविधान त्यांना त्यांची जागा दाखवेल असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.
तसेच शरद पवार म्हणाले तेच खरे आहे. दोन तृतीयांश बहुमत असले तरी शिवसेना मूळ पक्ष त्यांचा असू शकत नाही. घटनेच्या १० व्या सूचीनुसार दुसऱ्या गटाला विलीन व्हावेच लागेल. शिंदे गटाने छोटा भाजपा, मोठा भाजपा यात अंतर ठेवू नये. एकच भाजपा बनवावी. शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण असावं हे शिवसैनिक ठरवतील ४० आमदार ठरवू शकत नाही. त्यांना वेगळा पक्ष काढावा लागेल. वेगळे चिन्ह घ्यावे लागेल असंही खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले.
दरम्यान, जर कुणावर आरोप लागले असतील तर चौकशी व्हायला हवी. संजय राठोड यांच्यावर आरोप होते म्हणून त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला. मग भाजपाने ज्यांच्यावर आरोप लावले त्यांनाच मंत्री बनवले ही नैतिकता आहे का? आता महाराष्ट्र सरकारचं महत्त्वाचे खातेही राठोडांना द्यावं. १२ तारखेच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीबाबत विचारला असतं हे सरकार पडणार असल्याचा दावा प्रियंका चतुर्वेदी यांनी केला.
बाळासाहेब ठाकरेंचं नाव का नाही घेतलं?
बाळासाहेबांचा फोटो काढून तुमचा पक्ष काढावा. पण ती हिंमत नाही. नाव आमचं वापरायचं. शिवसेना म्हणायचं. मग शपथविधी घेताना तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे नाव विसरलात का? ठाकरे घराण्याने तुम्हाला सगळं दिलं. त्यांनी एखादवेळेस पद घेतले त्याचा आनंद व्हायला हवा होता. अडीच वर्ष सहन करू शकला नाहीत. तुमच्या ईडीच्या कारवाया, खोटं बोलायचं. गैरव्यवहार त्यातून काढलेली पळवाट आहे अशा शब्दात खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे.