शिर्डी येथील महिलेच्या पोटात दीड किलो खिळे, पिना!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 05:44 AM2018-11-14T05:44:23+5:302018-11-14T05:45:00+5:30
मानसिक आजार : अहमदाबादच्या हॉस्पिटलमध्ये झाली शस्त्रक्रिया
अहमदाबाद : शिर्डी येथील संगीता नावाच्या मध्यमवयीन महिलेच्या पोटावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून खिळे, नट-बोल्ट, पिना आणि बांगड्या यासह एकूण दीड किलो वजनाच्या वस्तू बाहेर काढण्यात आल्या. मानसिक आजार असलेली ही महिला शहराच्या शहर कोठडा भागात भ्रमिष्ट अवस्थेत फिरताना आढळल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तिला सरकारी मनोरुग्णालयात ठेवले होते. पोटात असह्य वेदना होत असल्याची तक्रार केल्याने तिला सिव्हिल इस्पितळात दाखल केले.
इस्पितळात ३१ आॅक्टोबर रोजी एक्स-रे काढला असता तिच्या पोटात अनेक अखाद्य वस्तूंचा मोठा संचय झाल्याचे आणि काही सेफ्टी पिना तिच्या डाव्या फुफ्फुसातून बाहेर लोंबकळत असल्याचे दिसून आले. डॉ. नितीन परमार यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या चमूने संगीतावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अडीच तास चाललेल्या शस्त्रक्रियेत तिच्या पोटातून ज्या वस्तू व ज्या संख्येने बाहेर काढल्या गेल्या, त्याने डॉक्टरही अचंबित झाले. यात एक इंच लांबीचे लोखंडी खिळे, नट-बोल्ट, तांब्याची वळी, बांगड्यांचे तुकडे, सेफ्टी पिना, केसाच्या पिना, मंगळसूत्र आदी गोष्टींचा यात समावेश होता.
संगीताची केस ‘अॅक्युफेजिया’ विकाराची आहे. ही व्याधी अतिशय विरळ असून, वर्षातून असा एखादाच रुग्ण आढळून येतो. यात रुग्णाला टोकदार व अखाद्य वस्तू खाण्याची इच्छा होते. मनोरुग्णांमध्ये अशा केसेस दिसतात.
-डॉ. नितीन परमार, शल्यचिकित्सक, सिव्हिल हॉस्पिटल