कारागृहातही शशिकलांना VVIP वागणूक, 31 दिवसांत 14 जणांची भेट
By admin | Published: April 5, 2017 05:37 PM2017-04-05T17:37:18+5:302017-04-05T17:39:16+5:30
बेहिशेबी संपत्तीप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना कारागृहात व्हीव्हीआयपी वागणूक मिळत आहे
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 5 - बेहिशेबी संपत्तीप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना कारागृहात व्हीव्हीआयपी वागणूक मिळत आहे. फक्त 31 दिवसांमध्ये 14 लोकांनी कारागृहात जाऊन शशिकला यांची भेट घेतली आहे. नियमांनुसार शशिकला यांना इतक्या दिवसांमध्ये फक्त दोनच लोकांना भेटण्याची परवानगी आहे. टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार कारागृहात जाऊन शशिकलांची भेट घेतलेल्या 14 जणांचं नाव रजिस्टरमध्ये नोंद आहे. बेहिशेबी संपत्तीप्रकरणी शशिकला यांनी 16 फेब्रुवारी रोजी न्यायालयात आत्मसमर्पण केलं होतं, ज्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती.
शशिकला यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना कारागृहात स्वतंत्र सेल देण्यात आलं नव्हतं. त्यांना कारागृहात मेणबत्त्या बनवण्याचं काम देण्यात आल्याची माहिती मध्यंतरी समोर आली होती. मात्र सध्या समोर आलेल्या माहितीनुसार शशिकला कारागृहात इतर कैद्यांप्रमाणे सामान्य जीवन जगत नाही आहेत. कारागृहातही त्यांना विशेष वागणूक मिळत असून नियमांना डावललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शशिकला यांना कारागृहात एका सेलिब्रेटीप्रमाणे वागणूक दिली जात आहे. पोलिसांपासून ते अधिकारी, नेते सर्वजण त्यांच्या सेवेत हजर आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे तामिळनाडू मुख्यमंत्रीपदाच्या लढतीत शशिकला यांच्याच गटाचा विजय झाला होता. शशिकलाचे समर्थक पलनीसामी सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि याचाच फायदा शशिकला यांना मिळत आहे.
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय असलेल्या शशिकला यांनी जयललितांच्या मृत्यूनंतर तामिळनाडूच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मुख्यमंत्रीपदापासून काही दूर असतानाच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि त्यांना विधानसभेऐवजी कारागृहात जावं लागलं.
अपिलाच्या काळात 33 दिवस कारावास भोगून झाला असल्याने शशिकला यांचा मुक्काम पुढील तीन वर्षे 11 महिने बंगळुरूच्या तुरुंगात असणार आहे.